धर्मनगरी नाशिक येथील प्रथितयश सोनार आडगावकर यांची मुलगी रसिका आणि मुसलमान मुलगा असिफ यांच्या नावाची लग्नपत्रिका सामाजिक माध्यमांत प्रसारित झाल्यानंतर सजग हिंदूंच्या मनात चिंता उत्पन्न झाली. त्यानंतर हा विवाह रहित झाला. ‘हा विवाह वधूच्या पित्याकडून अधिकृतरित्या सालंकृत कन्यादान होऊन पार पडणार’ ही हिंदूंसाठी चिंतेची गोष्ट होती. ‘आतापर्यंत सर्वत्र हैदोस घालत असलेला ‘लव्ह जिहाद’ आता सुरळीतरित्या पुढच्या टप्प्यात जात आहे का ?’ असे हिंदूंना वाटत होते. ‘हिंदु मुलीने मुसलमानाशी विवाह करणे’, हे आतापर्यंत बहुतांश वेळा तिला फसवून, आमिषे दाखवून, प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, अपहरण करून होत होते. काही श्रीमंत किंवा अपवादात्मक विवाह थाटामाटात झाले असतीलही; परंतु ‘सर्वसामान्य समाजाने ते अनुकरणीय मानलेले आहेत’, असे चित्र नाही. देशभरातील सहस्रो लव्ह जिहादच्या घटना पहाता हिंदु वधूचे पिता स्वतःहूनच त्यांची कन्या मुसलमानाला स्वखुशीने देत असल्याची ही घटना काही जागरूक हिंदूंना आत्मघातकी वृत्तीची वाटली. मुसलमानांना हिंदु मुलींशी विवाह करून घेण्यासाठी ही घटना एक आदर्श उदाहरण म्हणून समोर राहिले असते. खर्चापरी खर्चही झाला असता, मुलींचे आयुष्य उद़्ध्वस्त झाले असते आणि हिंदु समाजाच्या वंशविच्छेदाला एक अधिकृत रूपच जणू प्राप्त झाले असते’, इतके याचे भयावह परिणाम होते. सामाजिक माध्यमांत या लग्नाच्या पत्रिकेमुळे गदारोळ झाला. हे एक प्रकारे हिंदू सजग झाल्याचेच लक्षण म्हणावे लागेल. आधुनिक, निधर्मी आणि बुद्धीवादी यांना हा वेडगळपणा किंवा मूलतत्त्ववाद वाटेल, यात शंका नाही; परंतु आजघडीलाही लव्ह जिहादमुळे होरपळलेल्या आणि होरपळत असलेल्या सहस्रो हिंदु युवती अन् स्त्रिया यांचे हाल पहाता सजग हिंदूंच्या मनांत उमटलेली ही संवेदनशीलता अगदी योग्यच म्हणावी लागेल.
निधर्मीवाद्यांचा थयथयाट !
हिंदु धर्मियांना अधर्माच्या खाईत लोटू पहाणार्या अंनिससारख्या संघटनेने ‘हा जातपंचायतीचा निर्णय असल्याने गुन्हे नोंद करावेत’, असे हास्यास्पद विधान केले आहे. नाशिकसारख्या मोठ्या शहाराला जातपंचायत कुठून आली ? तथाकथित बुद्धीवाद्यांना हिंदू-मुसलमान ऐक्याचे एक उदाहरण गमावल्याचे दुःख झाले आहे. जेव्हा आजूबाजूला लव्ह जिहादच्या अत्याच्यारांत मुली होरपळल्या जात असल्याची सहस्रो उदाहरणे घडत होती, तेव्हा यांना दुःखाचे उमाळे का आले नाहीत ? जेव्हा लव्ह जिहादला बळी पडलेल्या युवतींनी त्यांना चटके दिल्याचे, छळ केल्याचे, गोमांस भक्षण करायला लावल्याचे, अन्यांसमवेत संबंध ठेवायला लावल्याचे आणि धर्मांतरासाठी बळजोरी केल्याचे अनुभवकथन केले, तेव्हा ही मंडळी कुठे होती ? जेव्हा या छळातून सोडवून आणलेल्या युवतींचे अंगावर शहारे आणणारे व्हिडिओ प्रसारित झाले, तेव्हा कधी या निधर्मीवाद्यांना दुःख झाले नाही. नाशिक येथील प्रकरणात मात्र सजग हिंदूंनी या लग्नाला विरोध केल्यामुळे निधर्मीवाद्यांची टोळी थयथयाट करत आहे. भारतातील लव्ह जिहादची भयावहता आणि आतापर्यंत नोंद झालेले गुन्हे, पीडित मुलींच्या दुर्दैवी कहाण्या या पार्श्वभूमीवर झालेली ही गोष्ट योग्य असल्याचे कुणीही सुजाण व्यक्ती सांगेल. भले हा विवाह म्हणजे लव्ह जिहाद असेल किंवा नसेल; पण म्हणून ‘परधर्मियाला अशा प्रकारे थाटामाटात लग्न करून मुलगी सोपवणे’, ही गोष्ट ती मुलगी, कुटुंब, समाज, धर्म आणि देश या सर्वांच्या दृष्टीनेच घातक संदेश देणारी आहे. आज काही अपवादात्मक मुसलमानांच्या घरांत लग्न केलेल्या हिंदु मुली कदाचित् आनंदात रहात असतीलही; परंतु हिंदु मुलगी आणि मुसलमान मुलगा यांच्या विवाहाला विरोध करण्यामागील हिंदूंना वाटणारी चिंता, असुरक्षितता, भीती यांविषयीही चर्चा करण्याची वेळ आली !
सजग हिंदूंचे यश !
हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि ज्ञाती संघटना यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सध्या हा विवाह रहित झाल्याचे मुलीच्या वडिलांंनी घोषित केले आहे. हिंदूंनी सतर्क होऊन, विशेष म्हणजे एकत्र येऊन संबंधितांचे प्रबोधन केले, हे महत्त्वाचे आहे. अंतिमतः त्यांना एका हिंदु मुलीला संभाव्य नरकयातनांतून वाचवण्यात यश मिळाले आहे, असे म्हटले, तर फारसे चुकीचे नाही. यामुळे ‘हिंदूंच्या संघटित प्रयत्नांना यश मिळते’, हे इथे पुन्हा एकदा सिद्ध झाले आणि सामाजिक माध्यमांचाही राष्ट्र अन् धर्म कार्यासाठी चांगल्या प्रकारे उपयोग करता आल्याचे एक उदाहरणही त्या निमित्ताने समोर आले. ‘ज्ञाती संघटनाही समाज आणि धर्म यांसाठी एक चांगले काम करू शकतात’, हेही या निमित्ताने लक्षात आले. त्यांनी धर्माभिमान जपत घेतलेल्या पुढाकारासाठी त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे. काही माध्यमांनी त्यांचा नोंदणीविवाह झाल्याचे म्हटले आहे; परंतु ज्ञाती संघटनेच्या पदाधिकार्यांकडून ‘नोंदणी विवाह झालेला नाही’, असे म्हटले गेले आहे. ‘शिक्षक म्हणून घरी येणार्या या मुसलमानाने दिव्यांग (दृष्टी, बोलणे, ऐकणे, हाडे किंवा मन यांच्याशी संबंधित दोषांमुळे विकलांग झालेल्या व्यक्ती) मुलीशी सुत जुळवले आणि तो तिच्याशी विवाह करत आहे’, यात कदाचित् तिच्या पित्याची असाहाय्यताही असू शकते; परंतु आतापर्यंतचा अनुभव पहाता यात संबंधितांचा कावेबाजपणा नसेल, याची निश्चिती देऊ शकत नाही. कुणीही पिता कन्येचे भलेच चिंतणार हे नक्की ! जिथे धोका वाटू शकतो, अशा घरात तो तिला देणार नाही. त्यामुळे आज सजग हिंदूंनी वधूच्या पित्याला सतर्क करून त्याचे भलेच चिंतले आहे अन् त्याच्या कुटुंबासह त्या मुलीला संभाव्य अनेक संकटांपासून वाचवले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे निधर्मी प्रसारमाध्यमे आणि अंनिस यांसारख्यांनी सर्वधर्मसमभावाची कितीही ओरड मारली तरी ‘चटका बसल्यावर ताकही फुंकून पितात’ याप्रमाणे आतापर्यंतचा लव्ह जिहादचा भयानक अनुभव पहाता जे झाले ते योग्यच झाले. ‘हिंदूंनी धर्मांधांपासून हिंदु स्त्रियांना वाचवण्यासाठी दीड सहस्र वर्षे घनघोर लढाया लढल्या गेल्या आहेत’, हे ध्यानात घेऊया आणि त्या दृष्टीने या घटनेकडे पाहूया !