संपादकीय : हरवलेले समाधान !

वार्षिक ४० लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या गुरुग्राममधील (हरियाणा राज्य) एका व्यक्तीला ती ‘गरीब’ आहे, असे वाटते. त्यामुळे तिला रात्रीची झोप लागत नाही, अशी माहिती एका आधुनिक वैद्याने अलीकडेच दिली. बी.एम्.डब्ल्यू.सारखे आलिशान चारचाकी वाहन, उत्तम रहाणीमान आणि आर्थिक सुबत्ता असूनही त्या व्यक्तीला गरिबीच्या भावनेने ग्रासलेले आहे. देशातील बहुतांश नोकरदारवर्गाला ‘श्रीमंत असणे’ म्हणजे नेमके काय ? याविषयीही मोठा संभ्रम आहे; कारण श्रीमंतीची परिमाणे अलीकडे आलिशान जीवन जगण्याकडे झुकलेली आहेत. इच्छांच्या ओझ्याखाली आवश्यकतांचे समाधान हरवले की, श्रीमंती आणि गरिबी यांच्या झुल्यावर हेलकावणारी मनःस्थिती निर्माण होते. आधुनिक समाजाच्या मानसिकतेचे हे गंभीर चित्रण आहे. भारताच्या महानगरांतील लाखो युवक, व्यावसायिक, नोकरदार आणि उद्योजक याच मानसिक संघर्षातून जात आहेत.

आज उत्पन्न वाढले आहे, उपभोगाच्या सुविधा वाढल्या आहेत, तंत्रज्ञानामुळे जीवन अधिक सुखकर झाले आहे; परंतु मनःशांती, समाधान आणि आत्मिक स्थैर्य कायमचे दूर गेले आहे. ‘जगण्याच्या धडपडीत या तिन्ही गोष्टी आत्मसात करायला हव्यात’, असे वाटत असल्याने ईर्ष्या, तुलना आणि स्पर्धा यांमुळे कृतीत न येता केवळ ‘सुविचार’ म्हणून सामाजिक माध्यमांत ‘लाईक’पुरत्या मर्यादित रहातात.

पूर्वी गरिबी, म्हणजे २ वेळचे अन्न न मिळणे, अंगावर पुरेसे वस्त्र नसणे आणि रहाण्यासाठी घर नसणे, अशी स्थिती मानली जात असे. आजही भारतात अशा प्रकारची गरिबी अस्तित्वात आहे; परंतु त्यासमवेत एक नवी गरिबी निर्माण झाली आहे, ती म्हणजे मनाने मानलेल्या गरिबीची ! भारत विकसनशीलतेकडून विकासाकडे झेपावत आहे, तसा समाज आवश्यकतांकडून आलिशानतेकडे वळत आहे. आजच्या काळात एखाद्या व्यक्तीकडे घर, वाहन, शिक्षण, उत्तम वेतन आणि सर्व सुखसोयी असूनही त्याला अपूर्णत्व जाणवते; कारण त्याची तुलना स्वतःशी नसून इतरांशी होत आहे. चित्रपट, रिॲलिटी शो यांमधील आलिशान जीवनपद्धतीची खरोखरच गरीब असलेल्या व्यक्तीलाही भुरळ पडलेली आहे. त्यामुळेच अन्न, वस्त्र, निवारा यांसह किमान ७ ते १० सहस्र रुपयांचा भ्रमणभाष प्रत्येकाकडे असतोच. खरोखर गरीब असणार्‍यामध्ये हा पालट झाला आहे.  अलीकडील विविध सर्वेक्षणांनुसार भारतातील अनुमाने ८८ टक्के शहरी नागरिक स्वतःला ‘मध्यमवर्गीय’ समजतात. विशेष म्हणजे उत्पन्नात मोठा भेद असूनही श्रीमंत, उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय या सर्वच गटांतील लोक स्वतःला ‘मध्यमवर्गीय’ म्हणवून घेतात. दुसर्‍या एका सर्वेक्षणानुसार केवळ ३० टक्के कर्मचारी स्वतःच्या वेतनावर समाधानी आहेत. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे माणूस स्वतःची तुलना खालच्या स्तराशी न करता वरच्या स्तराशी करतो. परिणामी आर्थिक प्रगती झाली, तरी समाधानाची भावना निर्माण होत नाही. अगदी १ लाख रुपये वार्षिक कमाई असलेली व्यक्ती आणि ४० लाख रुपये वार्षिक कमाई असलेली व्यक्ती, दोन्हीही एकाच वर्गात मोडतात आणि दुसर्‍याला पाहून अधिकाधिक मिळवण्याच्या धडपडीतच तारुण्याचा मोठा काळ यात जातांना पहायला मिळतो. दुसर्‍याशी केलेल्या तुलनेमुळेच प्रत्यक्षात श्रीमंत असूनही व्यक्ती मानसिकदृष्ट्या गरीबच बनते.

सामाजिक माध्यमे : असमाधानाची आधुनिक यंत्रणा !

एकेकाळी व्यक्तीची तुलना तिच्या शेजार्‍यांशी किंवा समाजातील काही मोजक्या लोकांशी होत असे, जी आज सामाजिक माध्यमांमुळे जगभरातील कोट्यधीश, उद्योगपती, चित्रपट कलाकार, ‘इन्फ्ल्युएन्झर’ आणि तथाकथित यशस्वी व्यक्ती यांच्याशी होऊ लागली आहे. भ्रमणभाषवर सातत्याने दिसणारे सहकार्‍यांचे ‘स्टेटस’, त्यांच्या विदेशातील सहलींची छायाचित्रे, व्हिडिओ यांचा साहजिक परिणाम पहाणार्‍यावर होऊन त्याच्याही तशाच इच्छा निर्माण होतात. त्यासह स्वतः मागे पडत असल्याची भावना निर्माण होते.  ‘द्रष्टा दृश्यवशात् बद्धः ।’ या उक्तीप्रमाणे हा परिणाम होतो. सामाजिक माध्यमांवर दिसणारे जीवन हे वास्तव नसून ते वास्तवाचे ‘एडिटेड’ (संपादित) रूप असते. अनेक जण स्वतःचे यश दाखवतांना त्यामागचा संघर्ष लपवतात. आनंद दाखवतांना चिंता लपवतात. आलिशान जीवनपद्धत दाखवतांना त्यासाठी घेतलेली कर्जे लपलेली असतात; परंतु पहाणारा ‘जगातील सर्व लोक सुखी आहेत. केवळ मी दुःखी आहे’, असा समज निर्माण करून घेतो. मानसशास्त्रीय अभ्यासांनुसार सामाजिक माध्यमांवरील सततची तुलना आत्मसमाधान न्यून करते आणि अपूर्णतेची भावना वाढवते. त्यामुळे व्यक्ती स्वतःच्या यशाकडे दुर्लक्ष करून इतरांच्या यशामुळे अस्वस्थ होऊ लागते. आजची संपूर्ण अर्थव्यवस्था इच्छांची निर्मिती करण्यावर आधारित आहे. आजच्या जाहिरातींची भाषा लक्षात घेतली, तर त्यांचा मूलभूत संदेश एकच असतो, ‘तुमच्याकडे जे आहे ते पुरेसे नाही.’ त्यामुळे व्यक्ती सतत असमाधानी रहाते. नवीन भ्रमणभाष, नवीन वाहन, नवीन घर, नवीन ‘ब्रँड’ यांमागे धावते. प्रत्येक वस्तू काही काळासाठी आनंद देते; परंतु लगेचच नवीन अपेक्षा निर्माण करत असते. हाच उपभोगवाद समाधान देत नाही आणि पुरेसे नसल्याची जाणीव उत्पन्न करत रहातो.

गेल्या दशकात मुंबई, देहली, गुरुग्राम, बेंगळुरू आणि भाग्यनगर (हैदराबाद) यांसारख्या महानगरांमध्ये घरांच्या किमती लोकांच्या उत्पन्नाच्या तुलनेत अधिक वेगाने वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी मध्यम आकाराच्या सदनिकेची किंमत १ ते ३ कोटी रुपयांपर्यंत पोचली आहे. त्यामुळे उच्च वेतन असलेल्या व्यक्तींनाही गृहकर्जाचे मोठे हप्ते, मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि जीवनशैलीचा वाढता खर्च यांमुळे आर्थिक ताण जाणवतो. त्याचप्रमाणे महानगरांतील वाढत्या कर्जसंस्कृतीमुळे बाह्य वैभवाच्या आड अंतर्गत आर्थिक असुरक्षितता वाढत आहे. त्यामुळे आजचा प्रश्न ‘आपल्याकडे किती आहे ?’ हा नसून ‘आपल्याला किती पुरेसे वाटते ?’ हा आहे. आजचा भारतीय युवक संपत्ती मिळवण्याच्या शर्यतीत वेगाने धावत आहे; परंतु त्या शर्यतीची अंतिम रेषा कुठे आहे ? हेच त्याला ठाऊक नाही.

आधुनिक उपभोगवादी व्यवस्थेत व्यक्तीचे मूल्य तिच्या वेतनावर, घरावर, वाहनावर आणि उपभोगशक्तीवर ठरवले जाते. याउलट भारतीय संस्कृती संतोषाला, समाधानाला सर्वोच्च स्थान देते. संत तुकाराम महाराजांचे ‘चित्ती असो द्यावे समाधान ।’ हे वचन याच जगण्याची खरी कला शिकवते. समाधान म्हणजे निष्क्रीयता नव्हे, तर प्रयत्नांनंतर मिळालेल्या फळाचा स्वीकार करणे, म्हणजे समाधान ! आजच्या जगात अर्थ आणि काम यांनाच सर्वोच्च स्थान मिळाले आहे. धर्म आणि मोक्ष या संकल्पना जीवनातून जवळजवळ नाहीशा होत आहेत. त्यामुळे पैसा मिळत आहे; पण त्याचा उपयोग कशासाठी करायचा ? याचे उत्तर मिळत नाही. जीवनात खरा आनंद कशात आहे ? याची शिकवणच मुळी हिंदु धर्म आणि संस्कृती देते. त्याचीच आता आवश्यकता आहे.

आलिशान जीवनपद्धत नव्हे, तर समाधान आणि मानसिक शांती ही खरी समृद्धता आहे, हे जाणा !