वायू, जल, देश आणि काल यांत विकृती निर्माण झाल्यास महामारी पसरते !
महामारी म्हणजे अनेक लोकांना तथा जनसमुदायाला मृत्यूमुखी पाडण्यासाठी गंभीर स्वरूप धारण केलेला आजार किंवा व्याधी. गावांत, जिल्ह्यांत, राज्यांत, देशात किंवा भूखंडात रहाणार्या सर्वच लोकांना अशा व्याधीस सामोरे जावे लागते. कोणताही आजार किंवा व्याधी यांच्या कारणांची विभागणी साधारण तथा असाधारण या दोन वर्गांत केली जाते. जनसमुदायासाठी सर्वसाधारणपणे साधारण कारणे लागू होतात. व्यक्ती विशिष्ट दोषांचा प्रकोप करणारी आणि दोषांना बिघडवणारी या कारणांचा समावेश असाधारण कारणांत होतो. ही कारणे त्या विशिष्ट व्यक्तीपुरती मर्यादित असतात. मनुष्यासह इतर प्राणीमात्रांसाठी उपयोगी असणारा वायू (सभोवतालच्या वातावरणातील हवा), जल (वापरात असणारे पाणी), देश (जनसमुदाय रहातो तो जमिनीचा भूखंड) तथा काल (त्या ठिकाणी चालू असलेला ऋतू-काल किंवा ज्योतिषशास्त्रानुसार विकृत ग्रहांमुळे उत्पन्न झालेला अनिष्ट कालावधी) अशा सर्वच गोष्टींमध्ये जेव्हा विकृती उत्पन्न होते, तेव्हा आयुर्वेदानुसार महामारी पसरते.
‘काल’ दूषित झाल्यास सर्वांनाच त्याचे परिणाम भोगावे लागतात !
हवा दूषित झाल्यास पालट म्हणून तुम्ही इतर ठिकाणी रहायला जाऊ शकता. पाण्यामध्ये दोष उत्पन्न झाले, तर ते पाणी शुद्ध करून, उकळवून, तसेच औषधी द्रव्यांनी सिद्ध करून कदाचित् वापरात आणू शकता. भूखंडात वैगुण्य उत्पन्न झाल्यास तो देश सोडून जाणे जरी कठीण असले, तरीही दुसरीकडे जाऊन राहू शकतो; परंतु ‘काल’ हा विकृत झाला, तर आपण कुठेही गेलो, तरी तो टाळू शकत नाही. त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात.
आजूबाजूची हवा, पाणी, भूमी ही विकृत गुणांनी युक्त होते. याचा अर्थ आहे की, या घटकांमध्ये आपल्या सर्वांच्या स्वास्थ्यासाठी, निरोगी शरिरासाठी आवश्यक असणारे गुण न्यून झालेले असतात, तसेच विषाणूंसाठी आवश्यक असणारे वातावरण सिद्ध झालेले असते. परिणामी हे विषाणू स्वरूपातील राक्षस जे आपल्या आजूबाजूच्या आसमंतात असतात, ते सहज आपल्या शरिरावर घाला घालू शकतात. परिणामस्वरूप नैसर्गिक प्रकोपामुळे अशा महामारीचे स्वरूप गंभीर रूप धारण करू शकते.
ऋतूंमधील विपर्यायामुळे (पालटांमुळे) महामारी उद्भवणे
आपले व्याधीक्षमत्व कितीही चांगले असले, तरीही आजूबाजूच्या आसमंतातील विषाणूंची राक्षसी प्रवृत्ती बोकाळलेली असते. ऋतूंमधील विपर्यय् (पालट) हा अशा महामारींसाठी पुष्कळ महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. भर उन्हाळ्यात अचानक मुसळधार पाऊस पडणे किंवा थंडीमध्ये पाऊस पडणे, असे प्रकार ऋतूचक्रातील वैषम्य दाखवणारे असतात. याचेच उदाहरण म्हणजे ‘सार्स’ विषाणू, ‘मर्स’चे आक्रमण, स्वाईन फ्ल्यूची साथ आणि सध्या थैमान घालत असलेला हा कोरोना. अशा विषाणूंचा संसर्ग हा वायू, जल, देश तथा काल यांतील वैगुण्यामुळेच होतो. हे सर्व प्राणीमात्राला व्यापून असणारे घटक अचानक का बिघडतात ? याचे मार्मिक उत्तर केवळ आयुर्वेदाकडे आहे.
धर्मपालनानेच महामारीपासून रक्षण होऊ शकते !
खरेतर भारतीय भूखंड हा धर्म आणि संस्कृती यांसाठी ओळखला जातो. शिस्तबद्ध रूढी किंवा परंपरा पाळणे जमले नाही की, शारीरिक तथा मानसिक व्याधीला आमंत्रण मिळते. आयुर्वेदात महामारीचे प्रमुख कारण ‘अधर्मरूपी व्यवहार’ हेच सांगितले आहे. हा व्यवहार घडतो तो बुद्धीभेदामुळे ! अर्थात् प्रज्ञापराध, म्हणजेच बुद्धीकडून होत असणार्या चुका. चांगल्या किंवा वाईट परिणामांचा सारासार विचार करून बुद्धी आपल्याला योग्य अथवा अयोग्य गोष्टींचे मार्गदर्शन करत असते; परंतु शहरीकरणाच्या नावाखाली ऋतूचर्या किंवा दिनचर्या-रात्रीचर्या यांनुसार शरीरधर्म पाळला नाही, तसेच खाण्या-पिण्याचे ताळतंत्र बिघडले की, मानसिक कामक्रोधादी शत्रू वाढत जातात. याचाच परिणाम आपल्या भोवतालच्या वातावरणावर होतो. आजूबाजूचे प्रदूषण वाढत जाते आणि राक्षसस्वरूपी विषाणू महामारीच्या स्वरूपात संपूर्ण देशाला खाण्यासाठी सज्ज होतो. शारीरिक विकास किंवा नैतिक विकास, हेच खरेतर कोणत्याही धर्माचे मूलभूत खांब आहेत. सत्य, दया, दान, देवतार्चन, सद्वृत पालन, इंद्रियदमन अशा गोष्टींचे जाणीवपूर्वक पालन केल्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढायला लागते. परिणामी अशा विषाणूंचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही आणि अशा महामारींपासून आपले रक्षण होऊ शकते.
प्राणीमात्रांना भक्ष्य केल्याने मनुष्याला त्यांच्याकडून मिळणारा अभिशाप, हेही महामारीचे एक कारण !
अधर्म म्हणजे शरीर, विशिष्ट जाती-धर्म, जनसमुदाय आणि देश यांसाठी दिलेली चौकट सोडून वागण्याची प्रवृत्ती ! कोरोना विषाणूंचा संसर्ग होऊ नये, या उद्देशाने जागतिक आरोग्य संघटनेने नियम सांगितले आहेत. हे नियम केवळ हस्त-प्रक्षालन, पाद-प्रक्षालन किंवा गूद-प्रक्षालन यांपर्यंत मर्यादित न ठेवता हे आचरण पावित्र्यापर्यंत आणणे अपेक्षित आहेत. मनुष्याने प्राणीमात्रांवर दया करावी, ही भारतीय संस्कृती आहे. अशा प्राणीमात्रांवर दया करण्याऐवजी त्यांनाच जर भक्ष्य केले, तर त्या प्राण्यांच्या शरिरावर रहाणारे जीवाणू किंवा विषाणू आपल्यावर घाला घालणारच !
नागपंचमीला नागाची, बैलपोळ्याला बैलांची आणि दिवाळीला गायीची पूजा करतात. अशा बर्याच गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये पूज्य आहेत. प्राण्यांना जर नाहक त्रास दिला, तसेच काही प्राण्यांना भक्ष्य बनवले, तर त्यांचा शाप मिळतो, ज्याला आयुर्वेदामध्ये ‘अभिशाप’ म्हणतात. अभिशाप हे अशा (कोरोनासारख्या) महामारींसाठी एक कारण आहे. माकड, कबूतर, मोर यांची आपण पूजा करतो; पण मनुष्याचे संस्कृतीबाह्य आचरण असेल, तर अशा प्राणीमात्रांवर असलेले विषाणू नक्कीच त्रास देणार.
विषाणूंपासून वाचण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवायला हवा !
रक्षोगणादिभिः वा विविधैः भूतसङ्घैः तम् अधर्मम् अन्यद् वा अपि अपचारान्तरम् उपलभ्य अभिहन्यन्ते ।
– चरकसंहिता, विमानस्थान, अध्याय ३, श्लोक २२
अर्थ : अधर्म किंवा चुकीची कामे केल्याने लोक विविध प्राणीमात्रांकडून मारले जातात.
या श्लोकातून ‘नकळत मनुष्याच्या अतीअधार्मिक प्रवृत्तीमुळे अशा विषाणूंपासून बनवलेले घातक अस्त्र जनसमुदायाला नक्कीच मारक असू शकते’, हे लक्षात येते. अशा विषाणूंपासून आपला बचाव करण्यासाठी केवळ हात-पाय किंवा तोंड धुऊन बसण्यापेक्षा आपला परिसर स्वच्छ ठेवणे, घरासमोर सडा आणि रांगोळी घालणे, हे प्रयत्नही करायला हवेत. आजूबाजूला तुळस, निर्गुंडी, आंबा, अडुळसा, कडुनिंब यांसारखी झाडे लावण्याचा प्रयत्न असावा. अमावास्या किंवा पौर्णिमा या दिवशी दुचाकी किंवा चारचाकी वाहनांचीही पूजा करावी; कारण अशा वेळी या विषाणूंचा प्रभाव अधिक असतो. यासंदर्भात सांगितले, तर लोक मात्र आपल्यालाच मूर्खात काढतात !
– वैद्य रूपेश साळंखे, एम्.डी. आयुर्वेद, कायचिकित्सा प्रोफेसर, एस्.जी.वि. आयुर्वेदीक मेडिकल कॉलेज आणि संशोधन केंद्र, बैलहोंगल, जिल्हा बेळगाव.