मुंंबई, १० जुलै – मंत्रीमंडळ विस्ताराच्या आधी मोदी सरकारने ‘सहकार मंत्रालय’ या एका नव्या मंत्रालयाची घोषणा केली होती. मंत्रीमंडळ विस्तारानंतर या मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सोपवण्यात आला आहे. या नवीन सहकार मंत्रालयाची नेमकी भूमिका काय असणार ? त्याचा सहकार क्षेत्राला कसा लाभ होणार ? याविषयी सगळ्यांना उत्सुकता असली, तरी सहकारी क्षेत्रातील संस्था, अधिकोष, साखर कारखाने यांमध्ये होणार्या घोटाळ्यांना चाप बसवण्यासाठी नव्या सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आल्याची चर्चा सर्व राजकीय पक्षांतील नेते आणि नागरिक यांच्यात चालू आहे. या मंत्रालयामुळे सहकारी संस्थातील भ्रष्ट लोकप्रतिनिधी कारवाईच्या भीतीने हवालदिल झाले आहेत, तसेच मुळात अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री असून त्यांच्याकडेच सहकार मंत्रालय दिल्यामुळे अनेक नेत्यांचे धाबे दणाणले आहे.