शनिशिंगणापूर येथील मंदिर रक्षण मोहीम

श्री शनिदेव

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांसाठी प्रवेश निषिद्ध असूनही त्या चौथर्‍यावर चढून दर्शन घेण्याचा भूमाता ब्रिगेडच्या महिलांची धर्मद्रोही आणि आततायी मागणी होती. स्वतःला श्री शनिदेवांचे भक्त म्हणवून घेत प्रसिद्धीच्या हव्यासापोटी, तीव्र अहंकाराने भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी तेथे आंदोलन उभारले होते. या आंदोलनाची ठिणगी पेटताच धर्माभिमानी हिंदू, शनिभक्त, हिंदुत्वनिष्ठ महिला, ग्रामस्थ, देवस्थान समितीचे सदस्य यांनी धार्मिक परंपरांचे रक्षण करण्यासाठी प्रबोधनाचा वणवा पेटवला. धार्मिक प्रथांच्या रक्षणासाठी सहस्रो धर्माभिमान्यांनी कंबर कसली आणि भूमाता ब्रिगेडवाल्यांचे धर्मद्रोही प्रयत्न हाणून पाडले. श्री शनिशिंगणापूर येथील परंपरांच्या रक्षणाच्या मोहिमेच्या वेळी सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी अथक प्रयत्न केले.

परिणामी पोलिसांनी धर्मद्रोह्यांना सुपे (जिल्हा नगर) येथेच थांबवले. शनिशिंगणापूरपर्यंत पोचूही दिले नाही. ही वार्ता शनिशिंगणापूरमध्ये येताच सर्वांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. अनेकांच्या तोंडवळ्यावर आनंद, उत्साह आणि कृतज्ञतेचा भाव होता. ही सर्व मोहीम संपल्यानंतर शेवटी विविध जिल्ह्यांतून आलेल्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या आंदोलनस्थळी गावाचे सरपंच श्री. बाळासाहेब बानकर, गावातील ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे तरुण कार्यकर्ते अन् महिला कार्यकर्त्या उपस्थित राहिले. समारंभात अनेकांना भावाश्रू आवरता आले नाही. सरपंचांनी त्यांचे मनोगत व्यक्त करतांना सांगितले, ‘‘मागील दीड मासापासून हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक आमच्या गावात येऊन जे परिश्रम घेत आहेत, यासाठी आमच्याकडे शब्दच नाहीत. आमच्या गावात आम्हाला याविषयी जागृत केले आणि धर्मरक्षणासाठी उभे केले, याचे सर्व श्रेय हिंदु जनजागृती समितीला जाते. त्यामुळे धर्मरक्षणासाठी आम्ही कधीही उभे राहू.’’

(संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’)