महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वप्नील लोणकर नामक युवकाने नुकतीच आत्महत्या केली. उत्तीर्ण होऊनही सलग दीड वर्ष मुलाखत न झाल्याने त्याला नोकरी मिळाली नव्हती. ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे मायाजाळ’, असे त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. स्वप्नीलच्या कुटुंबियांनी सरकारच्या धोरणांचे अपयश स्वप्नीलच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप केला आहे. कठीण परीक्षा कमी वयात उत्तीर्ण होणार्या युवकाने निराशेत जाऊन टोकाचे पाऊल उचलणे, हे स्पर्धा परीक्षा देणार्या अन्य युवक-युवतींचे मन हेलावणारे आहे. ‘स्वप्नीलची आत्महत्या, हे एक उदाहरण असून अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी स्पर्धा परीक्षांच्या वरवर न दिसणार्या; पण अतिशय खोल असलेल्या दलदलीत अडकून बुडत आहेत’, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. यापूर्वी आयोगाने सविस्तर प्रश्न पद्धत पालटून वस्तूनिष्ठ प्रश्नांची पद्धत स्वीकारल्याने ‘कॉपी’ला वाव मिळणार असल्याचे आरोप झाले होते, जे रास्तही आहेत. पालटलेल्या सदोष बैठकव्यवस्थेमुळे या परीक्षेत सामूहिक ‘कॉपी’चे प्रकारही झाले होते. वर्ष २०१३ च्या पूर्व परीक्षेतील एका प्रश्नाच्या दुहेरी उत्तरामुळे अनेक जणांचे भवितव्य पणाला लागले होते. एकूणच या परीक्षेची पार्श्वभूमी सदोष आहे. त्यामुळे अथक कष्टाने अभ्यास करणार्यांची ही क्रूर चेष्टाच आहे, असेच जनसामान्यांना वाटते. ‘स्वसुखाची अभिलाषा न बाळगता कष्ट घेऊन लोकहित साधायला हवे’, असे ब्रीदवाक्य असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आता लोकहितासाठी कार्य करण्याची इच्छा असलेल्या तरुणांवर अन्याय होऊ नये, यासाठी स्वतः कष्ट घेणे अपेक्षित आहे.
तसेच देश पातळीवर असलेला केंद्रीय लोकसेवा आयोगही विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी कलंकित असल्याचे मध्यंतरी एका वृत्तवाहिनीने समोर आणले होते. या क्षेत्रात ‘जिहाद’सारखी प्रकरणे समोर आली आहेत. अंतिम परीक्षेत धर्मांध परीक्षकांचा गट त्यांच्या धर्माच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी अधिक गुण देत असल्याचे वृत्त या वृत्तवाहिनीने प्रसारित केले होते. यामुळे एकूणच देशपातळीवर स्पर्धा आणि प्रवेश परीक्षा यांच्या संदर्भात गांभीर्याने विचार करून ठोस कृती करायला हवी !
– श्री. केतन पाटील, पुणे