कष्टाळू, काटकसरी आणि इतरांना साहाय्य करायला तत्पर असणार्‍या वैद्या (सौ.) मंगला लक्ष्मण गोरे (वय ७२ वर्षे)!

कष्टाळू, काटकसरी आणि इतरांना साहाय्य करायला तत्पर असणार्‍या ढवळी, फोंडा, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या वैद्या (सौ.) मंगला लक्ष्मण गोरे (वय ७२ वर्षे)!

‘ढवळी, फोंडा (गोवा) येथील सौ. मंगला लक्ष्मण गोरे या वर्ष १९९७ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. ७ मार्च २०२१ या दिवशी त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले होते. त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सौ. मंगला गोरे

१. सौ. संध्या शेखर मांगले (मधली मुलगी), ठाणे, मुंबई

सौ. संध्या मांगले

१ अ. स्वतः कष्ट घेऊन शिकणे आणि मुलींनाही चांगले शिक्षण देणे : ‘आईमुळेच आम्हा तिघी बहिणींचे शिक्षण झाले. आई तिच्या लग्नानंतर किंबहुना पहिले अपत्य झाल्यावर वसतिगृहात राहून शिकली. ती आयुर्वेदाचार्य झाली. मला तिचा अभिमान वाटतो.

१ आ. मुलगा-मुलगी असा भेद न करता मुलींनाही शिकण्यासाठी प्रोत्साहन देणे

१. आमचे संगोपन करतांना तिने कधीही मुलगा-मुलगी असा भेद (५० वर्षांपूर्वी) केला नाही. आम्हाला तिने प्रत्येक ठिकाणी पूर्ण मुभा दिली होती. त्यामुळेच मी स्वरक्षण प्रशिक्षण, प्रथमोपचार, रायफल शूटींग, हे सर्व शिकू शिकले.

२. आई प्रत्येक नवीन गोष्ट स्वत: शिकायची आणि आम्हालाही शिकण्यास प्रोत्साहन द्यायची. वयाच्या ६० व्या वर्षी ती दुचाकी चालवायला शिकली आणि त्यानंतर चारचाकी वाहनही चालवायला शिकली.

१ इ. सनातनचे ग्रंथ वाचून ते आचरणात आणणे : ती कधीही वेळ वाया घालवत नाही. तिने सनातनचे सर्व ग्रंथ नुसतेच वाचले नाहीत, तर ती ते आचरणातही आणत आहे. आईच्या संपर्कात आलेला प्रत्येक माणूस तिच्या ज्ञानामुळे प्रभावित होतो. तिला या वयातही पुष्कळ उत्साह आहे. ते पाहून मलाही लाजल्यासारखे होते.

२. आध्यात्मिक पातळी ६३ टक्के असलेले श्री. वैभव आफळे (जावई) 

श्री. वैभव आफळे

२ अ. वडिलांचे नोकरीत स्थानांतर होणे, आईचे होणारे हाल अन् संसार चालवतांनाची कसरत पाहून गोरेआजींना ‘विवाह करायचा नाही अन् महिलांचे हाल होऊ नयेत, यासाठी  समाजसेवा करूया’, असे वाटणे, नंतर त्यांचा प्रारब्धानुसार विवाह होणे : ‘सौ. मंगला गोरे यांचे बालपण ग्रामीण भागात गेले. त्यांचे वडील तलाठी होते. त्यांचे सतत स्थानांतर होत असे. त्यांना वेतनही अल्प मिळायचे. त्यांचे वागणे शिस्तबद्ध होते. ते प्रामाणिक असल्याने ते ज्या गावात चाकरीसाठी जायचे, तेथे त्यांच्या विरोधातील लोक त्यांना फार काळ टिकू देत नसत. त्यामुळे त्यांना सतत या गावातून त्या गावात असे फिरावे लागे. यामुळे आईचे होणारे हाल आणि संसार चालवतांना होणारी कसरत पाहून ‘विवाह करायचा नाही आणि महिलांचे हाल होऊ नयेत, यासाठी  समाजसेवा करूया’ असे गोरेआजींना वाटत होते. सौ. गोरेआजींचा प्रारब्धानुसार विवाह झाला आणि विवाहानंतर आईसारख्या प्रेमळ सासूबाई मिळाल्याने त्यांना भगवंताप्रती कृतज्ञता वाटली.

२ आ. यजमानांच्या अनुपस्थितीत मुली आणि व्यवहार दोन्ही सांभाळणे :  सौ. गोरेआजींचे यजमान श्री. लक्ष्मण यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून राष्ट्रकार्य करण्याकडे कल होता. गोरेआजी दुकान चालवून मुलीना सांभाळत असत. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती.

२ इ. व्यावहारिक दृष्टीने सासू-सासरे असले, तरीही साधकासाठी ते अध्यात्मातील आई-वडील असणे : वर्ष १९९७  मी कधीच विसरू शकत नाही; कारण या वर्षी परात्पर गुरुमाऊलींनी मला ‘सनातनचा साधक’ म्हणून नवीन ओळख दिली आणि त्याच वेळी त्यांनी मला गोरे परिवारही दिला. माझ्या साधनेत गोरेआजोबा, गोरेआजी आणि सौ. गौरी यांचाच मोठा वाटा आहे. गुरुमाऊलींच्या कृपेने गोरे कुटुंब माझ्या जीवनात आले आणि मी साधना मार्गावर टिकून राहिलो. श्री. आणि सौ. गोरे हे माझे व्यावहारिक दृष्टीने सासू-सासरे असले, तरीही माझ्यासाठी ते अध्यात्मातील आई-वडील आहेत. त्यांनी केवळ माझीच नाही, तर माझ्या आई-वडिलांचीही सेवा केली आणि त्यांची काळजी घेतली.

२ ई. एका कठीण प्रसंगात श्री गुरु जीवनात येणे आणि गुरुदेवांच्या रूपात गोरे परिवाराने सांभाळणे : साधनेत येण्याआधी मी मोठ्या संकटात होतो. त्या वेळी माझ्यासमोर ‘जीवन संपवणे’ यापेक्षा कोणताच पर्याय नव्हता. माझा व्यवसाय चांगला चालू होता, तरी येणारी सर्व कमाई माझ्या भावाच्या देणेकर्‍यांना देण्यातच संपत होती. मला रहाण्यासाठी मुंबईत घर नव्हते. माझ्या काकूमुळे (श्रीमती विजया आफळे) श्री गुरु माझ्या जीवनात आले आणि गोरे परिवाराने गुरुदेवांच्या रूपातच मला सांभाळले. श्री. गोरेआजोबांनी त्यांचे मुंबईतील घर मला रहाण्यासाठी दिले. वर्ष १९९९ मध्ये माझा विवाह झाला. तेव्हापासून गोरेआजीच माझ्यासाठी आधार होत्या.

२ उ. पूर्णवेळ साधना करण्यासाठी वेळोवेळी साहाय्य करणे आणि प्रेरणा देणे : माझी संकटे आणि प्रारब्ध पहाता, तसेच व्यवसायातील माझ्या प्रामाणिक मेहनतीचे फळ दुसरेच घेत असल्याचे पाहून ‘मी केवळ साधनाच करावी. साधनेनेच प्रारब्धावर मात करता येते’, हा विचार त्यांनीच माझ्या मनावर बिंबवला आणि आजपर्यंत ते आम्हाला सांभाळत आहेत. ते मला पूर्णवेळ साधना करण्यासाठी वेळोवेळी साहाय्य करत आहेत आणि प्रेरणाही देत आहेत.

२ उ. गरजूंना साहाय्य करणे

२ उ १. एक जिज्ञासू उन्हातून आल्याने चक्कर आल्यावर त्यांना घरी आणून औषधोपचार करणे : आम्ही पनवेल येथे आश्रमाच्या जवळ रहात होतो. तेव्हा तेथे एक जिज्ञासू प्रतिमास भर दुपारी सायकलवरून सात्त्विक उत्पादने नेण्यासाठी येत असत. एकदा उन्हातून आल्याने त्यांना चक्कर आली. तेव्हा गोरेआजींनी त्यांना घरात आणले. त्यांच्या तळपायांना तेल लावून पाणी पिण्यास दिले. काही वेळाने त्यांना बरे वाटले. या वेळी आजींनी ‘ते अनोळखी आहेत’, असा विचार केला नाही. नंतर प्रत्येक वेळी ते जिज्ञासू आवर्जून घरी येऊन आजींना नमस्कार करून जायचे. ते म्हणाले, ‘‘हे घर नसून आश्रमच आहे आणि आजी माझ्यासाठी देवच आहेत’, असे वाटते.’’ त्यानंतर प्रत्येक वेळी ते घराकडे पाहून नमस्कार करून जाऊ लागले.

२ उ २. आमचे घर आश्रमाजवळच असल्याने गोरेआजी आणि गोरेआजोबा यांनी आश्रमातील सर्वच साधकांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर साहाय्य केले.

२ उ ३. साधकांना विविध प्रकारची औषधी तेले बनवून देणे : एकदा ‘एका साधकाला ब्राह्मीचे तेल हवे आहे’, हे समजल्यावर त्यांनी घराच्या बाहेर ब्राह्मी लावून त्याचे तेल बनवून त्या साधकाला दिले. त्यांनी साधकांना जास्वंदीचे तेल, दुधीचे तेल बनवून दिले. त्यांनी बनवून दिलेल्या दुधीच्या तेलाचा अनेक जणांना फार चांगला परिणाम लक्षात आला.

२ उ ४. संत आणि साधक यांची काळजी घेणे : ‘आश्रमातील संतांना काय द्यायला हवे ? कुठल्या साधकाला काय आवडते ? कुणाला काय पथ्य आहे ?’, हे आजींना चांगले ठाऊक असते. त्या वेळोवेळी सर्वांना ते देण्याचा प्रयत्न करतात. रुग्ण साधकाच्या जिभेला चव यावी, त्याला बरे वाटावे, अशी त्यांची तळमळ असते.

२ ऊ. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांनी काढलेले गौरवोद्गार : एकदा परात्पर गुरु पांडे महाराज म्हणाले होते, ‘श्री. आणि सौ. गोरे यांचे घर हे चुंबक आहे.’’(तेथे सर्व साधक आकर्षिले जातात.)

२ ए. जाणवलेले पालट

१. दळणवळण बंदीच्या कालावधीत त्यांना ‘माझे आयुष्य अल्प राहिले आहे. एवढी वर्षे देवाच्या कृपेने साधना झाली आणि यापुढील प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा ‘बोनस’ आहे’, याची तीव्रतेने जाणीव होऊ लागली. आता त्यांनी व्यष्टी साधनेचे प्रयत्न गांभीर्याने करण्यास आरंभ केला आहे. आता त्या ‘शरणागतभावाने प्रार्थना कशी करावी ?’, हे विचारून घेतात आणि त्यानुसार प्रयत्न करतात. त्यामुळे आता त्यांच्या स्वभावात आमूलाग्र पालट दिसू लागला आहे.

२. घरात त्या एका विचाराच्या आणि आम्ही अन्य कुटुंबीय वेगळ्या विचाराचे, असे बरेच वेळा घडत होते. आता त्यांनी सर्वांच्या विचारानुसार वागण्याचा प्रयत्न चालू केला आहे.

याआधी मी श्री. लक्ष्मण गोरे आणि सौ. मंगला गोरे यांच्याप्रती कृतज्ञतापुष्प अर्पण करण्यासाठी अनेक वेळा सूत्रे लिहिली; परंतु ती अपूर्णच रहात असत. एकदा संतांच्या सत्संगात संतांनी त्यांच्याविषयी लिहून देण्यास सांगितले. तेव्हा आधीची सर्व सूत्रे मला सूत्रबद्ध करता आली. यावरून ‘संतांची संकल्पशक्ती आणि त्यांच्यामुळेच आपण केवळ लिखाणच नाही, तर प्रत्येक गोष्ट करू शकतो’, याची मला जाणीव झाली.

‘गुरुमाऊलीच्या कृपेमुळे सुचलेली ही सूत्रे त्यांच्याच चरणकमली कृतज्ञताभावाने अर्पण करतो. ‘सौ. मंगला गोरेआजी अन् सर्व कुटुंबियांवर आपली अशीच अखंड कृपादृष्टी राहू दे’, अशी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करतो.(८.१२.२०२०)