लाडफे (डिचोली) येथील धबधब्याच्या ठिकाणी मद्यपान, कचरा आदींमुळे ग्रामस्थांनी पर्यटकांना रोखले

मंदिराच्या पवित्र तीर्थाच्या ठिकाणी पर्यटकांची हुल्लडबाजी

प्रतीकात्मक छायाचित्र

जनतेमध्ये भोगवाद प्रचंड बोकाळल्यामुळे परिस्थितीचे भान न ठेवता अशी कृत्ये केली जातात ! कोरोनामुळे दळणवळण बंदी झाल्यामुळे गेले दीड वर्ष अनेक अडचणींचा सामना करावा लागला, तरी जनता अजून सुधारत नाही, हेच यातून दिसून येते !

डिचोली –  पावसाळा चालू होताच पर्यटकांनी लाडफे (डिचोली) येथील धबधब्याच्या ठिकाणी गर्दी करणे चालू केले. मौजमजा करण्यासाठी या स्थळाला भेट देणार्‍या लोकांकडून मद्यपान करणे, मांस खाणे, सर्वत्र कचरा फेकणे आणि हैदोस घालणे इत्यादी प्रकारांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. पर्यटकांच्या या त्रासाला कंटाळलेल्या ग्रामस्थांनी मंदिर समितीच्या साहाय्याने हे स्थळ बंद केले आहे. ‘हे एक पवित्र स्थळ आहे. येथील झर्‍याचे पाणी शिमगोत्सवाच्या वेळी तीर्थ म्हणून सर्वांना दिले जाते’, असे मंदिर समितीचे तुषार मलिक यांनी सांगितले.

या धबधब्याच्या ठिकाणी भेट देणार्‍या पणजी येथील बार्रेटो नावाच्या व्यक्तीला तेथील पर्यटकांचे वर्तन आवडले नाही. त्यांनी डिचोली पोलीस स्थानकात त्याविषयी तक्रार केली. या धबधब्याच्या ठिकाणी पर्यटक गर्दी करत असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. पोलिसांनी पर्यटकांना तेथून हुसकावून लावले, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.