झोकून देऊन सेवा करणारे, धर्मप्रेमींशी जवळीक साधणारे आणि परात्पर गुरुदेवांप्रती दृढ श्रद्धा असलेले हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट !
‘आमच्या विवाहाला १७ वर्षे झाली. या कालावधीत मला माझे यजमान श्री. सुनील यांचे गुण पाहून त्यांच्याकडून शिकता येत नव्हते. मला त्यांच्यातील स्वभावदोष दिसून माझ्या त्यांच्याकडून अपेक्षा असायच्या. त्यातून माझ्या मनात त्यांच्याविषयी पूर्वग्रह निर्माण झाला. एका संतांनी मला सांगितले, ‘‘यजमानांचे गुण आणि त्यांच्यात झालेला पालट सांगा.’’ तेव्हापासून मला यजमानांमधील गुण लक्षात येऊ लागले. ज्येष्ठ कृष्ण पक्ष चतुर्थी (२८.६.२०२१) या दिवशी श्री. सुनील घनवट यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त माझ्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
श्री. सुनील घनवट यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. निवासाच्या ठिकाणी रामनाथी आश्रमासारखे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणे
एकदा आम्ही निवासासाठी एके ठिकाणी स्थलांतरित झालो होतो. तेथे साहित्य व्यवस्थित लावले नव्हते. आम्हाला ती सेवा पूर्ण करायला ४ – ५ दिवस लागले असते; पण श्री. सुनील यांच्यामुळे एका दिवसात सर्व साहित्य लावून झाले. ते स्पंदनांचा अभ्यास करून ‘डोळ्यांना कसे दिसते ? मनाला काय जाणवते ?’, असा अभ्यास करतात. त्यांची साहित्य ठेवलेल्या रचनेत कितीही वेळा पालट करण्याची सिद्धता असते. ते म्हणतात, ‘‘आपण रामनाथी आश्रमात असतो, तर साहित्य कसे लावले असते ?’’
२. प्रेमभाव
२ अ. मी रुग्णाईत असतांना ते संपूर्ण स्वयंपाक करतात. त्यांना ‘पदार्थ कसे करायचे ?’, हे ठाऊक असूनही ते मला विचारून करतात.
२ आ. पत्नी आणि मुलगा यांचे बोलणे ऐकून घेऊन नंतर त्यांना प्रेमाने सांगणे : पूर्वी श्री. सुनील यांना मला किंवा पार्थला (मुलाला) काही सांगायचे असल्यास, तसेच आमचे बोलणे त्यांना स्वीकारता आले नाही, तर ते चिडून बोलायचे. आता ते ‘आम्हाला काय सांगायचे आहे ?’, हे समजून घेतात आणि नंतर आम्हाला प्रेमाने अन् नम्रतेने समजावून सांगतात. पार्थ त्याच्या वडिलांनी सांगितलेले दृष्टीकोन मनापासून ऐकतो. त्यांनी सांगितलेले पार्थच्या अंतर्मनापर्यंत पोचते आणि तो लगेच तशी कृती करतो.
२ इ. ते सेवांच्या व्यस्ततेतही पार्थला वेळ देतात आणि त्याच्याशी खेळतात.
२ ई. आधार देणे
२ ई १. पत्नीला प्रत्येक प्रसंगात आधार देणे : आमचा विवाह झाल्यापासून त्यांनी मला प्रत्येक प्रसंगात आधार दिला आहे. मी भावनाशील झाले, अनावश्यक विचारांत अडकले किंवा माझ्या मनात नकारात्मक विचार आल्यास ते मला प्रेमाने समजावून सांगतात. त्यामुळे मला त्यातून बाहेर पडायला साहाय्य होते.
२ ई २. गावी गेल्यावर कुटुंबियांना साधनेविषयी सांगणे आणि कुटुंबियांनी नामजप चालू करणे : घरी गेल्यावर श्री. सुनील सर्वांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना प्रार्थना आणि नामजप करायला सांगतात. पूर्वी सासरी त्रास जाणवायचा. आता तेथील घरातील प्रत्येक खोलीत श्रीकृष्णाचे चित्र आणि नामजपाच्या पट्ट्यांचे वास्तूछत लावले आहे. श्री. सुनील घरी गेल्यावर स्वच्छता करणे, धूप दाखवणे, या कामांमध्ये साहाय्य करतात. श्री. सुनील यांच्यातील तळमळीमुळे घरातील सर्व जण नामजप करू लागले आहेत. सासरच्या घरातील श्रीकृष्ण-अर्जुनाच्या चित्रातील निर्गुण तत्त्व वाढले असून ते पांढरे आणि फिकट गुलाबी रंगाचे झाले आहे.
२ ई ३. कुटुंबियांना ‘श्री. सुनील यांच्या साधनेमुळे सर्व कुटुंबाचे चांगले चालू आहे’, असे वाटणे : माझ्या सासरी आणि माहेरी सर्वांना त्यांचा आधार वाटतो. आम्ही वर्षातून एकदा दिवाळीला घरी जातो. श्री. सुनील यांचे मोठे भाऊ आणि सर्वांचाच असा भाव आहे की, तुम्ही पूर्णवेळ राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करत आहात; म्हणून आम्हाला कशाचीच उणीव भासत नाही.
३. तत्त्वनिष्ठ
पार्थ हट्ट करत असेल किंवा ऐकत नसेल किंवा त्याची अयोग्य सवय लक्षात आल्यास ते त्याला शिक्षा करतात, उदा. अंगठे धरून उभे रहायला सांगणे, उठाबशा काढायला सांगणे, आश्रम सेवा करायला सांगणे.
४. सेवेची तळमळ
४ अ. कार्यक्रमांत सांगण्याच्या सूत्रांचा अभ्यास करणे : श्री. सुनील हिंदु राष्ट्र-जागृती सभा, पत्रकार परिषद किंवा अन्य हिंदुत्ववादी बैठका यांत सांगण्याची सर्व सूत्रे अभ्यासपूर्णरित्या काढतात. ते वेगवेगळ्या सूत्रांचा संदर्भ एकत्र करून सहसाधकांना त्याविषयी विचारून घेतात. त्यासाठी त्यांची पुष्कळ कष्ट घेण्याची सिद्धता असते. ते मध्यरात्री २ – ३ वाजता किंवा कधी कधी पहाटे झोपतात.
४ आ. दिवसभर सेवेसाठी वेळ मिळावा; म्हणून ते पहिल्यापासून रात्रीचा प्रवास करून पहाटे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचतात आणि थोडीशी विश्रांती घेऊन लगेच सेवेला आरंभ करतात.
४ इ. पुढाकार घेऊन आणि उत्साहाने सेवा करणे : श्री. सुनील यांना पहिल्यापासूनच ‘राष्ट्र आणि धर्म’ यांविषयीची सूत्रे आपोआप सुचतात. दळणवळण बंदीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीच्या निमित्ताने ‘व्यापक स्तरावर एक कार्यक्रम घ्यावा’, असे त्यांना सुचले. त्यांनी पुढाकार घेऊन सर्वांना सूत्रे सांगितली आणि संबंधितांना विचारून घेतली. त्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. त्या वेळी मी त्यांना विचारले, ‘‘तुम्हाला कसे सुचते ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘प्रार्थना केल्यावर देव सुचवतो.’’ त्यांचा सेवा करतांना १०० टक्के उत्साह आणि सकारात्मकता असते. ते हिंदु राष्ट्र-जागृती किंवा बैठका यांत शांतपणे आणि क्षात्रभावाने सूत्रे मांडतात. त्या वेळी वातावरणातही पालट जाणवतो.
४ ई. देहभान विसरून सेवा करणे : ते साधकांचे अनौपचारिक सत्संग घेणे, त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवणे, धर्मप्रेमी आणि अधिवक्ता यांच्यासाठी अन् अन्य शिबिरांचे आयोजन करणे, या सर्वच सेवा देहभान विसरून करतात. एकदा रात्री जागरणामुळे पित्त बरेच वाढल्याने त्यांना उलट्या होत होत्या. त्याही स्थितीत त्यांचा सेवेचा समन्वय चालू होता.
५. त्यांची जिज्ञासू, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्याशी कुटुंबाप्रमाणे; पण आध्यात्मिक स्तरावर जवळीक आहे.
६. परात्पर गुरुदेवांप्रती दृढ श्रद्धा
पार्थचा जन्म झाल्यावर काही कारणांमुळे आम्हा दोघांनाही नोकरी करावी लागणार होती. त्या वेळी आमच्याकडे पैसे नव्हते. आम्हाला रहायला घरही नव्हते. त्या वेळी मी त्यांना विचारले, ‘‘हे सगळे कसे होणार ? पुष्कळ कठीण वाटत आहे.’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘काळजी करू नकोस. परात्पर गुरुदेव आपल्या समवेत आहे.’’ त्या वेळी देवाने आम्हाला प्रत्येक प्रसंगात पुष्कळ अनुभूती दिल्या. पार्थ ७ वर्षांचा झाल्यावर आम्ही पुन्हा पूर्णवेळ साधना करू लागलो.
७. जाणवलेले पालट
७ अ. संतांचे आज्ञापालन करून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया गांभीर्याने राबवल्याने त्रासदायक आवरण न्यून होणे : काही कालावधी पूर्वी आम्ही रामनाथी आश्रमात येण्यापूर्वी त्यांचे वजन अधिक होते आणि तोंडवळा काळवंडलेला होता. आमची एक संतांशी आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याशी भेट झाल्यावर श्री. सुनील यांनी त्यांचे वजन न्यून करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे ठरवले. या कालावधीत त्यांनी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेचे प्रयत्नही गांभीर्याने करण्याचा निश्चय केला. यांमुळे त्यांचे वजन ६ मासांत न्यून होऊन त्यांच्यावरील त्रासदायक आवरणही न्यून झाले आहे. आता त्यांच्या तोंडवळ्यावर भाव जाणवतो.
७ आ. चुकांविषयी खंत वाटणे : या ४ मासांमध्ये त्यांचे स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेचे प्रयत्न वाढले आहेत. त्यांनी ‘अधिकारवाणीने बोलणे, आग्रही भूमिका असणे, अपेक्षा करणे, इतरांचा विचार न करणे’, या स्वभावदोषांवर मनापासून प्रयत्न केले. त्यांचे काही चुकल्यास ते माझी आणि पार्थची कान पकडून क्षमा मागतात.
७ इ. गुरुदेवांच्या अनुसंधानात राहून सेवा करणे : पूर्वी त्यांचे विविध अभ्यासवर्ग, मार्गदर्शन ऐकतांना ‘बुद्धीच्या स्तरावर विषय होतो’, असे वाटत असे. अलीकडे ‘त्यांचे सेवा करतांना गुरुदेवांप्रती अनुसंधान वाढले आहे’, असे वाटते. त्यांची प्रत्येक विषयात श्रद्धा आणि तळमळ जाणवते. त्यांनी सांगितलेला विषय अंतर्मनात पोचून उत्साह वाटतो.
७ ई. त्यांच्या सहवासात आपोआप उत्साह आणि सकारात्मकता वाढते.
८. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘परात्पर गुरुदेव, श्री. सुनील यांच्याविषयी लिहितांना माझा भाव दाटून येत होता आणि सर्व सूत्रे आपोआप लक्षात येत होती. गुरुदेव, तुम्हीच सर्वकाही करवून घेत आहात. ‘तुमच्याच कृपेमुळे हे सर्व होत आहे’, याची मला पदोपदी अनुभूती येत आहे. गुरुदेवा, ‘मला असेच शिकण्याच्या स्थितीत रहाता येऊ देत’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. अर्चना सुनील घनवट, पुणे (११.६.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |