राष्ट्रपतींच्या रेल्वेमुळे वाहतूक रोखून धरल्यामुळे आजारी महिला रुग्णालयात पोचू न शकल्याने तिचा मृत्यू

  • राष्ट्रपतींकडून जिल्हाधिकार्‍यांना महिलेच्या घरी पाठवून कुटुंबियांचे सांत्वन

  • पोलीस अधिकार्‍यासह ४ वाहतूक निरीक्षक निलंबित

मोठ्या नेत्यांच्या दौर्‍याच्या वेळी वाहतूक रोखण्यात येते. त्यामुळे नेहमीच सर्वसामान्य लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. यावर राष्ट्रपतींनी कायमस्वरूपी उपाययोजना काढण्याचा आदेश प्रशासनाला दिला पाहिजे !
वंदना मिश्रा

कानपूर (उत्तरप्रदेश) – भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रवास करत असलेली रेल्वे येथील गोविंदपुरी पुलावरून जात असतांना ४५ मिनिटे वाहतूक थांबवून ठेवण्यात आली होती. या वाहतुकीत अडकल्याने आजारी असलेल्या ‘इंडियन इंडस्ट्रीज असोसिएशन’च्या कानपूर शाखेच्या अध्यक्ष ५० वर्षीय वंदना मिश्रा रुग्णालयात पोचू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे निधन झाले. याची माहिती येथील विश्रामगृहात थांबलेल्या राष्ट्रपतींच्या पत्नींना समजल्यावर त्यांनी ती राष्ट्रपतींना सांगितली. यावर राष्ट्रपतींनी कानपूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांना तत्काळ मिश्रा यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करण्यासाठी पाठवले. या प्रकरणी एका पोलीस अधिकार्‍यासह ४ वाहतूक निरीक्षक यांना निलंबित करण्यात आले आहे. वाहतूक थांबवल्यावर वंदना मिश्रा यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना जाऊ देण्याविषयी वारंवार विनंती केली; परंतु पोलिसांनी अनुमती दिली नाही. रुग्णालयात पोचेपर्यंत वंदना मिश्रा यांचा मृत्यू झाला होता.