ताप
१. सर्व प्रकाराचे ताप : काडेचिराईत, सुंठ आणि डिकेमाली यांचा अष्टमांश काढा करून घ्यावा. पाती चहा दिल्यास घाम येऊन ताप न्यून होतो.
२. हिवताप : १० ग्रॅम जिरे कारल्याच्या रसातून किंवा जुन्या गुळासह द्यावे.
३. विषमज्वर (मलेरिया) : सुदर्शन चूर्ण किंवा महासुदर्शन काढा गुळवेल, त्रिफळा, घमासा आणि कडू पडवळ यांचा काढा करून त्याच्या पावभर तूप घालून पाणी उकळेपर्यंत आटवावे. हे तूप विषमज्वर आणि कावीळ यांवर उपयोगी आहे.
४. थंडी वाजून ताप : काडेचिराईत, सुंठ, कुटकी, खारीक आणि कुड्याची साल यांचा काढा करून त्यात मध घालून प्यावा.
५. पित्तप्रधान ताप : बडिशेप आणि सुंठ यांचा काढा द्यावा.
६. वातप्रधानताप :
- काडे चिराईत, नागरमोथा, वाळा, रिंगणी, डोरली, गुळवेल, गोखरू, सुंठ, पृश्निपर्णी, शालिपर्णी आणि पुष्करमूळ यांचा काढा द्यावा.
- काडे चिराईत, गुळवेल, धने, चंदन, वाळा, पित्तपापडा आणि फाळसा यांचा काढा द्यावा.
- काश्मरीच्या मुळांचा काढा द्यावा.
- गुळवेल कुटून रात्री पाण्यात भिजत ठेवावी आणि सकाळी ते पाणी गाळून आणि साखर घालून घ्यावे.
- गुळवेल, उपळसरी, बला अन् सालवण यांचा काढा वातज ज्वरावर घ्यावा.
- गुळवेल, सुंठ, नागरमोथा, हळद, पिंपळी, दारूहळद आणि धमासा यांचा काढा घ्यावा.
- दर्भमूळ, बलामूळ आणि गोखरू यांचा काढा साखर आणि मध घालून घ्यावा.
७. कफप्रधान ताप : काडे किराईत, कडूनिंब, पिंपळी, सुंठ, कापूरकाचरी, गुळवेल शतावरी आणि डोरली यांचा काढा द्यावा.
८. जुनाट ताप : पिंपळी गुळासमवेत द्यावी.
पिंपळी चूर्ण गुळवेलीचा स्वरस मधासमवेत द्यावा
९. जीर्णज्वर (बरेच आठवडे चाललेला ताप) : खारीक, मनुका, साखर आणि तूप दुधात कढवून द्यावे.
१०. जीर्णज्वर आणि आमवात : ३ ग्रॅम काडेचिराईत २० मि लि. पाण्यात भिजत ठेवावे. सकाळी वस्त्रगाळ करून त्यांत १५० मि. ग्रॅम कापूर, २५० मि. ग्रॅम शलाजित आणि १ चमचा मध घालून ७ दिवस घ्यावा.
सर्दी
- रात्री निजतांना ताजे फुटाणे खावे.
- पांढरा कांदा कापून हुंगावा.
१. जुनाट सर्दी : चित्रकहरिती अवलेह द्यावा.
२. पडसे : गवती चहा आणि पुदिना किंवा गवती चहा, दालचिनी आणि आले यांचा काढा करून आणि त्यात गूळ घालून द्यावा.
३. सर्दी, पडसे, ताप : गवती चहा, सुंठ आणि खडीसाखर यांचा अष्टमांश गरम काढा प्यावा.
खोकला
- कोरफडीचा गर मधासह किंवा सैंधव आणि हळद मिळवून द्यावा.
- कोरफडीचा रस + अडुळशाचा रस यांत पिंपळी आणि लवंगाची पूड घालून मधासह द्यावा.
- खैराची (खदिराची) आतली साल ४ भाग, बेहडा २ भाग आणि लवंग १ भाग यांचे चूर्ण मधासमवेत घ्यावे.
१. कफप्रधान खोकला : पिंपळी, पिंपळी मूळ, सुंठ, बेहडा यांचा अवलेह
२. कोरडा खोकला
- ६ ग्रॅम अळशीच्या बियांचे चूर्ण १०० मिलिलिटर पाणी घालून उकळून त्यात मध आणि साखर घालून घ्यावा.
- कोरड्या खोकल्यामध्ये काकडशिंगीचे चूर्ण तेलासह द्यावे.
३. खोकला आणि दमा
- पिंपळीचे चूर्ण मधासह घ्यावे
- पुष्करमुळाचे चूर्ण मधासह द्यावे.
- वंशलोचनाचे चूर्ण मधासह घ्यावे.
४. आवाज बसणे, खोकला आणि दमा : या रोगांवर खजूर, मनुका आणि पिंपळी वाटून तूप आणि मध यांसह चाटवावी.
५. डांग्या खोकला : काकडशिंगी, जेष्ठमध, वेलची, स्वर्जिकाक्षार, काळे मीठ, तूप आणि मधासह चाटवावे. कासविंद्याच्या पानाचा रस मधासमवेत अधूनमधून चाटवावा.
रक्तस्राव
- नाकातून, गर्भाशयातून, मूळव्याधीतून रक्तस्राव, उलटी किंवा जुलाबातून रक्तस्राव किंवा शरीरात कुठेही रक्तस्राव होत असल्यास उंबराच्या फळांच्या स्वरस घ्यावा.
- मासिक पाळीत, मूळव्याधीतून किंवा जखमेतून रक्तस्राव अधिक प्रमाणात होत असल्यास काण्डवेलीचा स्वरस गेरू आणि मधासमवेत द्यावा.
डोके दुखणे
- बकुळीच्या फुलांचे चूर्ण नाकात ओढावे.
- बदाम आणि केशर गायीच्या तुपाच्या निवणीत खलून नाकात घालावे किंवा बदामाची खीर प्यावी.
- जायफळ उगाळून लेप करावा.
- बदाम आणि कापूर दुधात उगाळून त्याचा लेप डोक्याला लावावा.
- केशर तुपात उगाळून चोळावे किंवा नाकात घालावे.
१. अर्धशिशी : गूळ आणि तूप एकत्र करून खावे, दुधात तीळ आणि वावडिंग वाटून त्याचा मस्तकावर लेप लावावा.
२. सर्दीने डोके दुखणे : दालचिनी उगाळून गरम लेप लावावा.
पोटात वात (गॅसेस)
- पिंपळी, पिंपळी मूळ, ओवा, चव्य यांनी सिद्ध केलेली कण्हेरी द्यावी.
- अळूच्या पाल्याचा रस द्यावा.
- उंबराचे पिकलेले फळ सारक आहे आणि शरीरास पुष्टी देते.
तोंड येणे
- जांभळाची किंवा बाभळीची आतली साल कुटून पाण्यात उकळून गुळण्या कराव्यात.
- उंबराच्या सालीच्या किंवा पानांच्या काढ्याच्या गुळण्या कराव्या.
- चिंचेची पाने तोंडात चघळावी आणि पानांच्या काढ्याने गुळण्या कराव्यात.
- जिरे कुटून त्याच्या पाण्यात चंदन उगाळून आणि त्यात वेलचीची पूड अन् तुरटीची लाही घालून गुळण्या कराव्यात.
- जेष्ठमध, नीलकमल, लोध्र आणि गायीचे दूध यांनी सिद्ध केलेले तिळाचे तेल तोंडाला लावावे आणि नाकात घालावे.
- तोंडात फोड आल्यावर पांढर्या गुंजेचा पाला, कंकोळ आणि खडीसाखर तोंडात चघळून द्रव गिळावा.
उसण भरणे
डिकेमाली, रेवाचिनी आणि काळा बोळ गरम पाण्यात वाटून उसण भरलेल्या जागी लावावी.
पाठ, सांधे, कंबर दुखणे
१० ग्रॅम कापूर ४० मिलिलिटर तिळाच्या किंवा एरंडेल तेलात उगाळून दुखणार्या जागी चोळावे.