बाटलेल्या हिंदूंची घरवापसी करा !

गेल्या १ सहस्र २०० वर्षांपासून भारतात हिंदूंचे धर्मांतर होत आहे. महंमद बिन कासीम याने पहिल्यांदा भारतावर आक्रमण केले, तेव्हापासून हिंदूंच्या बलपूर्वक धर्मांतराला प्रारंभ झाला. तत्पूर्वी हिंदू स्वतःच स्वेच्छेने धर्म पालटून बौद्ध आणि जैन धर्म स्वीकारत होते. इस्लामनंतर स्थापन झालेल्या शीख धर्माचाही हिंदूंनी स्वेच्छेने स्वीकार केला; मात्र इस्लाम स्वेच्छेने नाही, तर बळाचा वापर झाल्याने स्वीकारावा लागला, हाच इतिहास आहे. हिंदु राजांचा पराभव झाल्यानंतर मुसलमान आक्रमकांचे एकच काम रहायचे ते म्हणजे हिंदूंना मुसलमान बनवणे ! टिपू सुलतानने एका दिवसात १ लाख हिंदूंना बाटवल्याचा विक्रम केला आहे, हे हिंदूंना लज्जास्पद आहे. अशा स्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा उदय झाल्यावर त्यांनी ५ पातशाह्यांचा पराभव करत स्वतःचे राज्य स्थापन केले. ‘मोगलांना पराजित करता येऊ शकते’, असा आत्मविश्वास छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदूंना दिला. पुढे हेच हिंदवी स्वराज्य देशावर काही काळ होते; मात्र यात एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे मोगल अन् अन्य मुसलमान पातशाह्या यांनी धर्मांतरित केलेल्या हिंदूंचे शुद्धीकरण करून पुन्हा हिंदु धर्मांत घेण्याची कृती केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. इतकेच नव्हे, तर बजाजी निंबाळकर यांचे शुद्धीकरण करून घेतले. त्यानंतर महाराजांनी त्यांचा स्वतःच्या घराण्यातील मुलीशी विवाह लावून देऊन शुद्धीकरण करण्यात आलेल्यांकडे कोणत्या भावाने पहायला हवे, याचा आदर्श घालून दिला. दुर्दैवाने असे शुद्धीकरण पुढील काळात मराठे आणि पेशवे यांच्याकडून झाले नाही. देहलीवर मराठ्यांचे राज्य असतांना आणि शक्य असतांनाही ते (शुद्धीकरण) केले गेले नाही, ‘ही अक्षम्य चूक होती’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीच म्हटले आहे. जर मुसलमान राज्य जिंकल्यावर हिंदूंचे धर्मांतर करत असतील, तर हिंदूंनी त्यांचा पराजय केल्यावर बाटवण्यात आलेल्या हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात घेणे, हे त्यांचे कर्तव्य बनत होते. बाटलेल्या हिंदूंनाही पुन्हा आपल्या धर्मात येण्याची ओढ होती; मात्र त्यांचा अपेक्षाभंग झाला. त्यांची घरवापसी न झाल्याने आज यातीलच मोठ्या संख्येतील बाटगे हिंदू देशाचे आणि हिंदु धर्माचे वैरी झाले आहेत. देशाला यामुळे मोठी हानी सहन करावी लागत आहे. देशाची फाळणी याच चुकीमुळे झाली आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. हे पुन्हा होऊ नये, यासाठी हिंदूंनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर !

मोगलांकडून हिंदूंचे धर्मांतर होत असतांना इंग्रज या देशात आल्यावर ख्रिस्त्यांकडून हिंदूंचे धर्मांतर होऊ लागले. ते बळजोरीचे किंवा तलवारीच्या धाकावर नसले, तरी सौम्यपणे चालू राहिले. ‘स्वातंत्र्यानंतर या दोन्ही धर्मांकडून होणारी हिंदूंची धर्मांतरे थांबतील’, असे वाटत असतांना ईशान्य भारतातील काही राज्ये आज ख्रिस्तीबहुल झाली आहेत. देशातील ८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश येथे हिंदू आज अल्पसंख्यांक झाले आहेत, हे हिंदूंना चिंताजनक आहे ! हे थांबावे यासाठी हिंदूंच्या संघटना प्रयत्न करत असल्या, तरी त्यांना यश मिळालेले नाही. आज केंद्रात भाजपचे सरकार असतांना देशात हिंदूंचे धर्मांतर होत आहे. ख्रिस्ती मिशनरी आणि मुसलमानांचे धर्मगुरु यांच्याकडून हे धर्मांतर चालूच आहे. समान नागरी कायदा, धर्मांतरविरोधी कायदा, लोकसंख्या नियंत्रण आदी कायदे करण्याची मागणी होत असून ती पूर्ण व्हावी, ही हिंदूंची अपेक्षा आहे. उत्तरप्रदेशात धर्मांतरविरोधी कायदा करण्यात आल्यानंतर पहिल्या कारवाईत १ सहस्र हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या दोघा धर्मांधांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.कडून यासाठी साहाय्य मिळत असल्याचे उघड झाले. उत्तरप्रदेश सरकारने कायदा केला, ही कौतुकाची गोष्ट आहे. ‘असा कायदा केंद्रातील सरकारने आणि भाजपशासित अन्य राज्यांनी का केला नाही ?’, असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होत असणार, यात शंका नाही. असे असले, तरी १ सहस्र हिंदूंचे धर्मांतर होत असतांना पोलीस, प्रशासन आणि गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या ? असा प्रश्न उपस्थित होतोच. उत्तरप्रदेशमध्ये १ सहस्र हिंदू धर्मांतरित झाले, तर अन्य राज्यांत काय स्थिती असणार ? असा प्रश्नही निर्माण होतो. ‘आंध्रप्रदेशमधील २५ टक्के लोक ख्रिस्ती झाले आहेत; मात्र ते त्यांची नावे पालटत नसल्याने ते लक्षात येत नाही’, अशी माहिती यापूर्वीच सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेसचे खासदार राजू यांनी दिली होती, म्हणजे स्वातंत्र्यानंतरही हिंदूंचे धर्मांतर होत रहाणे, हे हिंदूंना लज्जास्पद आहे.

हिंदूंचे होणारे धर्मांतर रोखा !

आता हे कायमचे थांबवण्यासह धर्मांतरित झालेल्या हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात आणण्यासाठी हिंदूंच्या संघटना, संप्रदाय, शंकराचार्य आणि धर्माचार्य यांनी प्रयत्न केले पाहिजेत. सरकारनेही बाटलेल्या हिंदूंना पुन्हा धर्मांत आणण्यासाठी योजना लागू केली पाहिजे. याची मागणी हिंदूंनी सरकारकडे केली पाहिजे, तरच हिंदूंची झालेली हानी भरून काढता येईल. अन्यथा ‘एका हिंदूंचे धर्मांतर म्हणजे ‘एक हिंदू अल्प झाला’, असा नसून ‘एका शत्रूची वाढ झाली’, असा आहे’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि स्वामी विवेकानंद यांनी म्हटलेले आहे, हे हिंदूंनी विसरू नये. त्यामुळे हिंदूंनी आता कृतीशील झाले पाहिजे. यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न केले गेले पाहिजेत. केवळ कट उघडकीस येऊन, धर्मांधांना अटक करून, त्यांना शिक्षा होणे पुरेसे नाही, तर हिंदूंना स्वगृही परत आणणे अधिक महत्त्वाचे आहे. ‘धर्मांतर करून मुसलमानांची लोकसंख्या वाढवणे आणि भारताला इस्लामी देश करणे’, हा ‘लोकसंख्या जिहाद’ आहे, जो ख्रिस्त्यांनी ईशान्य भारतात यशस्वी करून दाखवला आहे, हे लक्षात घ्यायला हवे आणि त्याविरोधात प्रयत्न केला पाहिजे. त्याच जोडीला हिंदूंचे धर्मांतर होऊ नये; म्हणून हिंदूंना धर्मशिक्षण देण्यास प्रारंभ केला पाहिजे. हिंदूंच्या संघटनांनी त्यासाठी युद्धपातळीवर आता प्रयत्न करावे आणि हिंदूंचे होणारे धर्मांतर रोखावे !