राष्ट्र आणि धर्म निष्ठ जीवन जगण्याची एक प्रगल्भ संस्कृती अन् व्यवस्था हिंदु राष्ट्र !

एके काळी अवघ्या विश्‍वाचा आध्यात्मिक गुरु असलेल्या भारतात पुढील काळातही संपूर्ण विश्‍वाला धर्मशिक्षण दिले जाऊन रामराज्य, म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापन होणार आहे. हे अनेक संत, द्रष्टे आणि भविष्यवेत्ते यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. आध्यात्मिक पाया असलेले हे ईश्‍वरनियोजित हिंदु राष्ट्र अवतरण्यासाठी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले रात्रंदिवस झटत आहेत. हे संधीकाळाचे दिवस लवकरच संपतील. हे राष्ट्र केवळ राजकीयदृष्ट्या हिंदु राष्ट्र नसेल, तर ‘धर्माधिष्ठित’ असेल, म्हणजे ‘धर्म’ हा राष्ट्रीय जीवनाचा केंद्रबिंदू असेल ! धर्माधिष्ठित जीवन जगण्याची ती प्रगल्भ संस्कृती असेल !

१. राष्ट्रनिष्ठ आणि धर्माधिष्ठित जीवन जगण्याची एक प्रगल्भ संस्कृती अन् व्यवस्था !

काही जणांना ‘हिंदु राष्ट्र’ म्हटले की, एखाद्या राजकीय पक्षाने मांडलेली त्याच्या लाभाची संकल्पना आठवते; पण ‘हिंदु राष्ट्र’ ही संकल्पना म्हणजे राजकारण नाही, तर राष्ट्रनिष्ठ आणि धर्माधिष्ठित जीवन जगण्याची ती एक प्रगल्भ संस्कृती अन् व्यवस्था असेल.

२. ईश्‍वरसंकल्पित सामाजिक व्यवस्था म्हणजे ‘ईश्‍वरी राज्य’ !

‘हिंदु राष्ट्र’ म्हटले की, त्याकडे ‘हिंदूंंचे राष्ट्र’ अशा काहीशा संकुचित अर्थाने पाहिले जाते. तथापि ‘हिंदु राष्ट्र’ ही मानव, पशू, पक्षी, किडा, मुंगी, वृक्ष, वेली आदींपासून सूक्ष्मातीसूक्ष्म जिवांच्या उद्धाराचा विचार बाळगणारी एक ईश्‍वरसंकल्पित सामाजिक व्यवस्था असेल; म्हणून तिला ‘ईश्‍वरी राज्य’ म्हणता येईल.

३. जनहितकारी पितृशाही असलेले ‘आदर्श राज्य’ !

त्यागी आणि राष्ट्रहिताचा विचार करणारा धर्माचरणी समाज, कर्तव्यनिष्ठ सुरक्षायंत्रणा, सत्यान्वेषी न्यायप्रणाली आणि कार्यक्षम प्रशासन, ही या ‘हिंदु राष्ट्रा’ची वैशिष्ट्येे असतील. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रप्रेम आणि धर्मनिष्ठा बाळगणारे, तसेच समाजहितासाठी निःस्पृहपणे अहोरात्र झटणारे राज्यकर्ते, हे या ‘हिंदु राष्ट्रा’चे आधारस्तंभ असतील. असे ‘हिंदु राष्ट्र’ जगातील एक ‘आदर्श राज्य’ असेल !

४. जगासाठी आदर्श राज्यपद्धत

सनातन हिंदु धर्म हा नीतीचे मूळ आहे. धर्मनिरपेक्ष राज्यप्रणालीमध्ये धर्माचे (पंथाचे नव्हे) अधिष्ठान नसल्याने राष्ट्रातील नागरिकांचे नैतिक अधःपतन होत आहे. त्यामुळे कालबाह्य साम्यवाद, अत्याचारी हुकूमशाही आणि स्वार्थी लोकशाही या फसलेल्या राज्यपद्धतींना ‘हिंदु धर्माधिष्ठित राज्यप्रणाली’ हा आदर्श पर्याय आहे. राष्ट्रीय जीवनात नैतिकतेचे संवर्धन करण्यासाठी जगातील सर्वच राष्ट्रांना हिंदु धर्माधिष्ठित राज्यप्रणाली अंगिकारणे आवश्यक ठरते.

५. विश्‍वशांतीसाठी उपयुक्त !

पृथ्वीवर शांततामय जीवन जगायचे असेल, तर हिंसाचाराची नव्हे, तर सहिष्णुतेची आवश्यकता आहे. सनातन हिंदु धर्म सहिष्णुतेसारख्या उच्चतम मूल्यांची जोपासना करण्याची शिकवण देतो. त्यामुळे तो जगासाठी कल्याणकारी आहे. हिंदु धर्माधारित राज्यप्रणाली जगभरातील राष्ट्रांनी आचरणात आणल्यास हिंसाचारी प्रवृत्तीचा लोप होईल; परिणामी जगभर युद्धबंदी होऊन अवघे जग शांती अनुभवेल आणि विश्‍वशांतीचे महान ध्येय साध्य होईल !

(संदर्भ – ‘हिंदुजागृती डॉट ओआर्जी’ संकेतस्थळ)