कोल्हापूर – पावसाळा तोंडावर आल्याने शहरातील किती धोकादायक इमारतींवर कारवाई केली, किती इमारती उतरवल्या, किती इमारती दुरुस्त केल्या यासंबंधीची सविस्तर माहिती दोन दिवसांत देण्याच्या सूचना महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी अधिकार्यांना दिल्या. पाऊस आणि संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.
प्रशासक डॉ. बलकवडे म्हणाल्या, ‘‘पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना कोरोनासंबंधीचे नियम पाळून स्थलांतरीत करण्याचे नियोजन करावे. त्यांच्यासाठी आताच शाळा किंवा सभागृह बघून ठेवावे. उद्यान आणि विद्युत् विभागाने शहरातील धोकादायक झाडे, खांब पावसापूर्वी उतरवून घेण्याची कार्यवाही करावी. महापूर आल्यास बाधित क्षेत्रातील वाहने अन्य ठिकाणी लावण्यासाठी आणि जनावरे ठेवण्यासाठी विभागीय कार्यालयांनी त्यांच्या क्षेत्रातील जागा आताच राखीव ठेवाव्यात. ज्याठिकाणी नाले सफाई झालेली आहे, अशा ठिकाणी पहिल्या मोठ्या पावसाने पुन्हा गाळ भरला असेल, तर त्याठिकाणी पुन्हा स्वच्छता करून घ्यावी.’’