आयुष मंत्रालय, भारत सरकारचे ‘क्षेत्रीय सहसुविधा केंद्र, पश्चिम विभागा’चा प्रयत्न !
मुंबई – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाकडे राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय, भारत सरकारचे पश्चिम विभागाचे ‘क्षेत्रीय सहसुविधा केंद्र’ आहे. या केंद्राच्या वतीने राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दमण-दीव, तसेच दादरा आणि नगर हवेली या भागांतील शेतकर्यांना औषधी वनस्पतींच्या लागवडीविषयी मार्गदर्शन करण्यात येते.
या केंद्राकडे अडुळसा, निर्गुंडी, अर्जुन, सर्पगंधा, पाडळ (पाटला), टेंटू (श्योनाक), गुळवेल, गुग्गुळ, चित्रक, अग्निमंथ, सीता अशोक, शिवण (गंभारी), जितसाया, शतावरी, बेल, आवळा, हिरडा, बेहडा, जलब्राह्मी, अनंतमूळ, मंडूकपर्णी, वेखंड, रिठा इत्यादी औषधी वनस्पतींची उत्कृष्ट दर्जाची रोपे उपलब्ध आहेत. ही रोपे केंद्राच्या वतीने औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात लागवड करू इच्छिणार्या शेतकर्यांना वितरित करायची आहेत.
‘प्रथम संपर्क करणार्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर रोपांचे वितरण केले जाणार आहे. केंद्राकडून रोपे मिळवण्यासाठी शेतकर्यांनी ‘क्षेत्रीय सहसुविधा केंद्र, पश्चिम विभागा’च्या ९०२१०८६१२५ या क्रमांकावर किंवा [email protected] या ई-मेल वर संपर्क साधावा, असे आवाहन केंद्राने केले आहे. रोपांची मागणी देतांना शेतकर्यांना ‘रोपांची लागवड आणि सांभाळ’ यांविषयीचे हमीपत्र, तसेच ज्या भूमीत लागवड केली जाईल, त्या भूमीचा ७/१२ उतारा सोबत जोडणे बंधनकारक आहे.
रोपांसाठीची मागणी ४ ते २५ जूनपर्यंत स्वीकारण्यात येणार असून १ ते १० जुलै या काळात त्यांचे वितरण केले जाणार आहे, याची शेतकर्यांनी नोंद घ्यावी.