गोव्यातील संचारबंदीत १४ जूनपर्यंत वाढ

जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत खुली !

पणजी, ५ जून (वार्ता.) – गोवा राज्यातील राज्यस्तरीय संचारबंदीमध्ये १४ जून २०२१ या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्वीट करून दिली. राज्यात ७ जूनपर्यंत संचारबंदी लागू होती आणि संचारबंदीमध्ये वाढ करण्याची मागणी समाजातील काही घटकांकडून होत होती.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने आता सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत. घरबांधणी किंवा दुरुस्ती यांच्याशी निगडित दुकाने, पावसाच्या पूर्वसिद्धतेसाठी आवश्यक असलेली दुकाने अन् ‘स्टेशनरी’ वस्तूंची विक्री करणारी दुकाने या वेळेत उघडण्यास मुभा असेल.’’


गोव्यात दिवसभरात १७ रुग्णांचा मृत्यू, तर ५६७ नवीन कोरोनाबाधित

पणजी – गोव्यात ५ जून या दिवशी कोरोनाबाधित १७ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात कोरोनाशी संबंधित ४ सहस्र १३१ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ५६७ नवीन रुग्ण आढळले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण १३.७३ टक्के आहे. ५ जून या दिवशी दिवसभरात १ सहस्र ४३३ रुग्ण कोरोनापासून बरे झाले, तर कोरोनाबाधित ९९ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यामुळे राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या घटून ८ सहस्र २१६ झाली आहे.