माजी सैनिकांनी पोलिसांना मारहाण करणे अपेक्षित नाही. त्यांनी स्वतः नियमांचे पालन करून इतरांनाही करायला लावणे अपेक्षित आहे !
संभाजीनगर – दळणवळण बंदीच्या काळात केलेल्या नाकाबंदीच्या वेळी पोलिसांनी अडवून १ सहस्र २०० रुपयांचा दंड ठोठावल्याचा राग आल्याने माजी सैनिक भगवान सानप (वय ३५ वर्षे) यांनी वाहतूक पोलिसांना शिरस्त्राणाने मारहाण केली, तसेच पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड आणि पोलीस हवालदार दिलीप माळे यांच्या बोटांचा त्यांनी चावा घेतल्याने त्यांच्या बोटाला खोलवर जखम होऊन टाके पडले आहेत. पोलिसांनी सानप यांना अटक केली आहे.
२ दिवसांपूर्वीच सानप यांना पोलिसांनी विनाशिरस्त्राण आणि विनाकारण फिरत असल्याच्या कारणावरून दंड ठोठावला होता. २६ मे या दिवशी पुन्हा पोलिसांनी त्यांना अडवल्यानंतर सानप यांचा राग अनावर झाला होता; मात्र पोलिसांनी त्यांना प्रथम सोडून दिले असतांनाही त्यांनी नाहक वाद वाढवल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यापूर्वी चेलीपुरा चौक येथे २ तरुणांनी नाकेबंदीच्या वेळी पोलिसांना मारहाण केली होती. (असुरक्षित पोलीस ! अशी स्थिती असल्यास पोलीस जनतेचे रक्षण आणि कायदा-सुव्यवस्था कसे राखणार ? – संपादक)