मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात सट्टेबाजाने ‘सीबीआय’कडे जबाब नोंदवला !

अटक टाळण्यासाठी १० कोटी रुपये देण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप

परमबीर सिंह

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात क्रिकेटमध्ये सट्टेबाजी करणार्‍या सोनू जालान याने मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाकडे स्वत:हून जबाब नोंदवला आहे. अटक टाळण्यासाठी परमबीर सिंह यांनी माजी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्याकडे १० कोटी रुपये जमा करण्यास सांगितल्याचा आरोप त्याने केला आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक राजकुमार हेही सहभागी असल्याचा आरोप जालान याने केला आहे.

जालान याने जबाबात म्हटले आहे की, मे २०१८ मध्ये एका सट्टेबाजीच्या प्रकरणात ठाणे पोलिसांच्या ‘अँटी-एक्स्टॉर्शन सेल’ने मला अटक केली. त्यानंतर मला तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे नेण्यात आले होते. या वेळी परमबीर सिंह यांनी माझ्याकडे भारतातील सक्रिय क्रिकेट सट्टेबाजीची माहिती विचारली, तसेच माझ्यासह कुटुंबातील सदस्यांना एका मोठ्या प्रकरणात अटक करण्याची धमकी दिली.