नागपूर येथे मराठी भाषेला डावलण्यावरून विधी सदस्य आक्रमक !

विद्यापिठाने त्वरित चूक दुरुस्त करण्याची मागणी

मराठी भाषेचा होणारा अवमान रोखायला हवा !

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठ

नागपूर – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाच्या ४ विद्याशाखांच्या अधिष्ठाता पदांसाठी देण्यात आलेल्या विज्ञापनामध्ये ‘मराठी भाषे’चे ज्ञान ही अटच देण्यात आलेली नाही. त्यामुळे मर्जीतील ‘हिंदी भाषिक’ उमेदवारांची अधिष्ठातापदी नियुक्ती करण्याचा हा डाव असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. या सूत्रावरून आता विधीसभा सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पदभरतीमध्ये मराठी भाषेचे ज्ञान असणे ही अट विद्यापीठ जर डावलत असेल, तर तो मराठी भाषेचा अवमान ठरेल, असे प्रतिपादन विधीसभा सदस्य अन् अधिवक्ता मनमोहन वाजपेयी यांनी केले आहे.

१. काही दिवसांपूर्वी अधिष्ठाता पदासाठी दिलेल्या विज्ञापनानुसार विज्ञान आणि तंत्रज्ञान, मानव्यशास्त्र, आंतरशास्त्रीय, तसेच वाणिज्य-व्यवस्थापन या विद्याशाखांच्या अधिष्ठातांची भरती होणार आहे.

२. कुलसचिव पदासाठी आवश्यक असणार्‍या पात्रतेमध्ये ‘मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य’, अशी अट घालण्यात आली आहे; परंतु अधिष्ठाता पदासाठीच्या अटींमध्ये अनिवार्यऐवजी ‘भाषेचे ज्ञान योग्य ठरेल’, असा उल्लेख आहे.

३. विद्यापिठातील बहुतांश प्रशासकीय कामे मराठी भाषेतून चालतात; मात्र तरीही विद्यापिठाने अधिष्ठाता पदांची भरती करतांना मराठी भाषेला दुय्यम स्थान दिल्याने सर्वांकडून खेद व्यक्त केला जात आहे.

‘संबंधित विज्ञापन प्रचलित नियमांच्या विरोधात असून तो मराठी भाषेचा अवमान आहे. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषेचे ज्ञान जवळजवळ सर्व स्तरांवर अनिवार्य करण्यात आले असतांनाही आपल्या विद्यापिठात मराठी भाषेला दुय्यम स्थान देणे, हे अतिशय दुर्दैवी आहे. विद्यापिठाने त्वरित ही चूक दुरुस्त करावी’, अशी मागणी अधिवक्ता वाजपेयी यांनी केली आहे.

दोषींवर कारवाई करा !

‘अधिष्ठाता पदासाठी देण्यात आलेल्या विज्ञापनात मराठी विषयाचे ज्ञान आवश्यक असल्याची अट नसणे, हे जाणूनबुजून करण्यात आल्याचा संशय निर्माण होत आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी अधिवक्ता वाजपेयी यांनी कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांना पत्राद्वारे केली आहे.