दळणवळण बंदीच्या काळात औषध घेण्यासाठी बाहेर पडणार्‍या तरुणाच्या कानशिलात लगावणार्‍या जिल्ह्याधिकार्‍याला पदावरून हटवले !

वस्तूस्थितीची माहिती न घेता निरपराध्यांना अशा प्रकारे मारहाण करणार्‍यांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे !

सूरजपूर (छत्तीसगड) –  राज्यात दळणवळण बंदीच्या काळात औषध आणण्यासाठी बाहेर पडलेल्या एका तरुणाच्या कानशिलात लगावणारे आणि त्याचा भ्रमणभाष संच रस्त्यावर आपटणारे सूरजपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांना पदावरून हटवण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी तात्काळ शर्मा यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश दिला.

मुख्यमंत्री बघेल यांनी ट्वीट करतांना म्हटले की, सामाजिक माध्यमांतून सूरजपूरचे जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांनी तरुणासमवेत केलेल्या चुकीच्या व्यवहाराचे प्रकरण माझ्या समोर आले. हे अतिशय दु:खद आणि निंदनीय आहे. छत्तीसगडमध्ये अशा प्रकारचे कृत्य खपवून घेतले जाणार नाही. कोणत्याही अधिकार्‍याचे शासकीय जीवनात अशा प्रकारचे आचरण खपवून घेतले नाही जाणार नाही. या घटनेने मी स्तब्ध झालो आहे. मी त्या तरुण आणि त्याचे कुटुंबीय यांच्याविषयी खेद व्यक्त करतो.