वैशाख मासातील (२३.५.२०२१ ते २९.५.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘१२.५.२०२१ या दिवसापासून वैशाख मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

सौ. प्राजक्ता जोशी

१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, उत्तरायण, वसंतऋतू, वैशाख मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे. २७.५.२०२१ पासून कृष्ण पक्ष चालू होणार आहे.

(संदर्भ : दाते पंचांग)

२. शास्त्रार्थ

२ अ. भागवत एकादशी : एखाद्या मासात ‘स्मार्त’ आणि ‘भागवत’ असे दोन दिवस एकादशी तिथी असते. तेव्हा स्मार्त, म्हणजे स्मृति आणि शास्त्रे मानणारे हिंदु ‘स्मार्त एकादशी’ करतात. भागवत धर्म पाळणारे वारकरी ‘भागवत एकादशी’ करतात. २३.५.२०२१ या दिवशी सकाळी ६.४३ पर्यंत भागवत एकादशी तिथी आहे.

२ आ. अमृत योग : वार आणि नक्षत्र यांच्या संयोगाने अमृत योग होतो. यालाच ‘अमृतसिद्धी योग’ म्हणतात. अमृत योगावर कोणतेही शुभ कार्य केल्यावर यश प्राप्त होते.

२ आ. १. २३.५.२०२१ या दिवशी हा योग सूर्योदयापासून दुपारी १२.१२ पर्यंत आहे. या दिवशी रविवार आणि हस्त नक्षत्र आहे.

२ आ. २. २६.५.२०२१ या दिवशी सूर्योदयापासून उत्तररात्री १.१५ पर्यंत हा योग आहे. या दिवशी बुधवार आणि अनुराधा नक्षत्र आहे.

२ इ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. २३.५.२०२१ या दिवशी सकाळी ६.४३ पासून दुपारी १२.१२ पर्यंत, २४.५.२०२१ या दिवशी सकाळी ९.४९ पासून उत्तररात्री १२.१२ पर्यंत आणि २९.५.२०२१ या दिवशी सायंकाळी ६.०४ पासून उत्तररात्री ४.०४ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.

२ ई. दग्ध योग : रविवारी द्वादशी, सोमवारी एकादशी, मंगळवारी पंचमी, बुधवारी तृतीया, गुरुवारी षष्ठी, शुक्रवारी अष्टमी आणि शनिवारी नवमी ही तिथी असेल, तर ‘दग्ध योग’ होतो. दग्ध योग हा अशुभ योग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. २३.५.२०२१ या दिवशी रविवार असून सकाळी ६.४३ पासून उत्तररात्री ३.३९ पर्यंत द्वादशी तिथी असल्याने ‘दग्ध योग’ आहे.

२ उ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यात विलंब होण्याचा संभव असतो. २३.५.२०२१ या दिवशी सकाळी ६.४३ पर्यंत, २५.५.२०२१ या दिवशी रात्री ८.३० पासून २६.५.२०२१ या दिवशी सकाळी ६.३७ पर्यंत, तसेच २८.५.२०२१ या दिवशी रात्री ८.०२ पासून २९.५.२०२१ या दिवशी सकाळी ६.३४ पर्यंत विष्टी करण आहे.

२ ऊ. सोमप्रदोष : प्रत्येक मासातील शुक्ल आणि कृष्ण त्रयोदशीला ‘प्रदोष’ असे म्हणतात. सोमवारी येणार्‍या त्रयोदशी तिथीला ‘सोमप्रदोष’ म्हणतात. २४.५.२०२१ या दिवशी सोमप्रदोष आहे. जीवनातील कोणत्याही प्रकारची न्यूनता आणि आर्थिक अडचणी नष्ट करण्यासाठी, तसेच आरोग्यप्राप्तीसाठी ‘सोमप्रदोष’ हे व्रत करतात. प्रदोष व्रतामध्ये सोमवारी येणार्‍या प्रदोष व्रताला विशेष महत्त्व आहे. प्रदोष या व्रताची देवता ‘शिव’ आहे. या दिवशी शिवकवच आणि शिवमहिम्नस्तोत्र वाचावे.

२ ए. श्रीनृसिंह जयंती : सूर्यास्तासमयी असणार्‍या वैशाख शुक्ल चतुर्दशी तिथीला ‘श्रीनृसिंह जयंती’ साजरी करतात. २५.५.२०२१ या दिवशी रात्री ८.३० पर्यंत वैशाख शुक्ल चतुर्दशी तिथी आहे.

२ ऐे. वैशाख स्नान समाप्ती : सूर्योदयव्यापिनी वैशाख पौर्णिमा तिथीला वैशाख स्नान समाप्ती करावी. अहोरात्र पौर्णिमा असल्यास उर्वरित पौर्णिमेस समाप्ती करावी. वैशाख मास अधिक मास असल्यास निज वैशाख पौर्णिमेला वैशाख स्नान समाप्ती करावी. २५.५.२०२१ या दिवशी रात्री ८.३० पासून २६.५.२०२१ या दिवशी सायंकाळी ४.४४ पर्यंत वैशाख शुक्ल पौर्णिमा तिथी आहे.  याच दिवशी सूर्योदयव्यापिनी वैशाख पौर्णिमा तिथी आहे.

२ ओ. बुद्धपौर्णिमा : सूर्योदयव्यापिनी वैशाख पौर्णिमा तिथीला ‘बुद्धपौर्णिमा’ किंवा ‘बुद्ध जयंती’ साजरी करतात. सूर्योदयव्यापिनी वैशाख पौर्णिमा तिथी २६.५.२०२१ या दिवशी आहे. या दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला. याच दिवशी त्यांना बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले.

२ औ. पुष्टिपति विनायक जयंती : श्री गणेशाच्या अवतारांपैकी एक अवतार, म्हणजे ‘पुष्टिपति विनायक.’ हा अवतार भगवान शिव-पार्वतीच्या घरी वैशाख शुक्ल पौर्णिमा दिनी ‘दुर्मति’ या राक्षसाच्या वधार्थ अवतरला. मुंबईत बोरीवली पूर्व येथे पुष्टिपति विनायक मंदिर आहे. २६.५.२०२१ या दिवशी ‘पुष्टिपति विनायक जयंती’ आहे.

२ अं. संकष्ट चतुर्थी : प्रत्येक मासातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला ‘संकष्ट चतुर्थी’, असे म्हणतात. ज्या दिवशी चंद्रोदय समयी चतुर्थी तिथी असते, त्या दिवशी संकष्ट चतुर्थीचा उपवास करतात; कारण श्री गणपतीच्या या व्रतामध्ये चंद्रदर्शन होणे विशेष महत्त्वाचे आहे. २९.५.२०२१ या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री १०.२७ आहे. या दिवशी श्री गणेश मंत्राचा जप करतात, तसेच अथर्वशीर्ष, श्री गणेशस्तोत्र, श्री गणेश अष्टोत्तरशत नामस्तोत्र वाचतात. या उपासनेने सर्व कार्ये सिद्ध होतात.

टीप १ : ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदयानंतर वार पालटतो.

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्‍लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, फोंडा, गोवा. (१५.५.२०२१)