वर्ष २०१३ मधील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी पत्रकार तरुण तेजपाल यांची  निर्दोष मुक्तता

गोव्यातील सत्र न्यायालयाचा निवाडा

पत्रकार तरुण तेजपाल

पणजी (गोवा) – सहकारी युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी तहलकाचे संस्थापक तथा माजी संपादक पत्रकार तरुण तेजपाल यांची म्हापसा येथील सत्र न्यायालयाने २१ मे या दिवशी निर्दोष मुक्तता केली.

वर्ष २०१३ मध्ये बांबोळी येथील एका तारांकित हॉटेलमध्ये आयोजित महोत्सवाच्या वेळी सहकारी महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून तेजपाल यांना ३० नोव्हेंबर २०१३ या दिवशी अटक करण्यात आली होती. त्यानंतर मे २०१४ मध्ये त्यांना जामिनावर सोडण्यात आले. या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने तेजपाल यांच्या विरोधात १७ फेब्रुवारी २०१४ या दिवशी न्यायालयात ३ सहस्र पानांचे आरोपपत्र प्रविष्ट केले होते. २८ सप्टेंबरला त्यांच्यावरील आरोप निश्‍चित करण्यात येऊन १५ मार्च २०१८ या दिवशी प्रत्यक्ष सुनावणी चालू झाली. पोलिसांनी जानेवारी २०२१ मध्ये तेजपाल यांच्या विरोधात १६१ पानांचे पुरवणी आरोपपत्र प्रविष्ट केले. या खटल्यात विशेष सरकारी अधिवक्ता फ्रान्सिस्को तावेरो यांच्यासह सहायक सरकारी अधिवक्ता सिंडिंयाना सिल्वा यांनी शासकीय पक्षाची बाजू मांडली.