‘तौक्ते’ चक्रीवादळाचे मुंबईत सर्वत्र थैमान !

  • अनेक ठिकाणी झाडे कोसळली      

  • समुद्राचे पाणी गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात शिरले !

लोकहो, अशा संकटांपासून कोणतीही सरकारी यंत्रणा नाही, तर ‘देवच वाचवील’, या श्रद्धेने साधना कराल, तरच सर्वच संकटांतूनही वाचाल !

चक्रीवादळामुळे गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात उसळलेल्या लाटा !

मुंबई – तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा पश्‍चिम किनारपट्टीला बसल्याने मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली होती. सकाळपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर या परिसरांत मुसळधार पाऊस पडला. ठिकठिकाणी झाडे पडणे, पत्रे उडून जाणे, विजेचे खांब कोसळणे अशा घटना घडल्याने लोकांनी चक्रीवादळाची भीषणता अनुभवली. मुसळधार पावसामुळे मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात समुद्राचे पाणी शिरले. हे पाणी गुडघाभर होते. मुंबईमध्ये ताशी १०२ कि.मी. वेगाने वारे वहात होते. चक्रीवादळामुळे मुंबई विमानतळ सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद होते. त्यामुळे विमानतळावर उतरणार्‍या ३ विमानांचा मार्ग पालटण्यात आला. चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या वेळी त्यांनी महाराष्ट्रातील परिस्थिती जाणून घेतली.

ओव्हरहेड वायरवर झाड पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या वेळी पावसामुळे ओव्हरहेड वायरचा स्फोट झाला. त्यामुळे तेथील वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती.