गोव्यात महिलांवरील अत्याचारांत वाढ : प्रत्येक सप्ताहात अत्याचाराच्या ४ तक्रारींची नोंद

पणजी, १५ मे (वार्ता.) – राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ झालेली आहे. प्रत्येक सप्ताहाला अत्याचाराच्या सरासरी४ तक्रारींची नोंद होत आहे, अशी माहिती गोवा पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.

पोलीस खात्याने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार वर्ष २०१७ ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत महिलांच्या विरोधात सुमारे १ सहस्रहून अधिक तक्रारी नोंद झाल्या आहेत. वर्ष २०२० वगळल्यास इतर सर्व वर्षांत किमान २०० हून अधिक तक्रारींची नोंद झाली आहे. सूत्रांनुसार या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये अधिकाधिक गुन्हेगार हे एक तर पीडित महिलेचे नातेवाईक असतात किंवा पीडित महिलेच्या शेजारी रहाणारी तिच्या ओळखीची व्यक्ती असते. आतापर्यंत झालेल्या सर्व लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयिताला कह्यात घेण्यात आलेले आहे. महिलांच्या संदर्भातील तक्रारी हाताळण्यासाठी खास महिला पोलीस ठाणे स्थापन करण्यात आले आहे. महिलांवर होत असलेल्या तक्रारींची जातीनिशी नोंद घेतली जाते आणि महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे.