मुंबई – मागील २ आठवड्यांशी तुलना केली, तर राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांमधील कोरोनाची रुग्णसंख्या न्यून झाली आहे; मात्र अद्यापही २४ जिल्ह्यांतील रुग्णांची वाढ कायम आहे. ही वाढ रोखणे, हे आमचे ध्येय आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ४ मे या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी राजेश टोपे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील कोरोनारुग्ण बरे होण्याची सरासरी देशाच्या सरासरीहून अधिक आहे. राज्याची रुग्ण आढळण्याची टक्केवारी २७ वरून २२ वर आली आहे. कोरोनाच्या चाचण्या कुठेही न्यून केलेल्या नाहीत. २ लाख ५० सहस्र ते २ लाख ८० सहस्र चाचण्या आपण प्रतिदिन करत आहोत. रुग्ण बरे होण्याची देशाची टक्केवारी ८१ टक्के, तर राज्याची टक्केवारी ८४.०७ टक्के इतकी झाली आहे.’’