खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे ‘आयपीएल्’ क्रिकेट स्पर्धेला स्थगिती !

सध्या संपूर्ण देश कोरोनाच्या भयंकर संकटात असतांना मुळात असल्या निरर्थक स्पर्धांना अनुमती मिळतेच कशी ? या स्पर्धेला अनुमती देणार्‍यांना सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे आणि या स्पर्धेसाठीचा पैसा गरीब कोरोनाबाधितांच्या उपचारांसाठी वापरला पाहिजे, अशीच जनतेची मागणी आहे !

मुंबई – खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे ‘आयपीएल्’च्या १४ व्या हंगामातील क्रिकेट स्पर्धेला स्थगिती देण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआयचे) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ४ मे या दिवशी ही घोषणा केली.

‘कोलकाता नाईट रायडर्स’ या संघाच्या २ खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे ३ मे या दिवशी आढळून आले. त्यानंतर ‘चेन्नई सुपर किंग्ज्’ या संघाच्या साहाय्यक कर्मचार्‍यांमधील एकाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यामुळे ३ मे या दिवशी होणारा कोलकाता नाईट रायडर्स आणि बेंगळुरू यांच्यातील सामना रहित करण्यात आला. त्यानंतर ४ मे या दिवशी हैदराबाद संघातील एका खेळाडूचाही कोरोनाचा अहवाल सकारात्मक आला. त्यामुळे या दिवशी चेन्नई आणि राजस्थान संघांमध्ये होणारा सामनाही रहित करण्यात आला. ‘आयपीएल्’चे सामने मुंबईत घेण्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिकाही प्रविष्ट करण्यात आली आहे. या सर्वांचा विचार करता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ‘आयपीएल्’ स्पर्धाच रहित करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धा पुन्हा कधी घेण्यात येणार ? घेतल्या तर कधी ?, यांविषयी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अद्याप काहीही माहिती दिलेली नाही.