तुम्ही आंधळे असू शकता, आम्ही नाही !

देहली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले !

नवी देहली – देशात कोरोनाच्या संदर्भात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याविषयी तुम्ही आंधळेपणाचे नाटक करू शकता, आम्ही नाही. आम्ही लोकांना मरतांना पाहू शकत नाही. केंद्र सरकारने डोळ्यांवर पट्टी बांधली असून आम्ही असे करू शकत नाही, अशा शब्दांत देहली उच्च न्यायालयाने ऑक्सिजन व्यवस्थापनाच्या संदर्भात संताप व्यक्त केला. यावर केंद्र सरकारची बाजू मांडणार्‍या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी या प्रकरणामध्ये भावनिक होण्याची काही आवश्यकता नसल्याचे मत व्यक्त केले. त्यावर न्यायालयाने ‘येथे लोकांचे प्राण पणाला लागले असून हे भावनिक सूत्रच आहे’, असे सांगितले. देहलीतील कोरोना परिस्थितीच्या संदर्भात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणीच्या वेळी न्यायालयाने कठोर शब्दांत संताप व्यक्त केला.


१. ऑक्सिजनची कमतरता असल्याने देहलीमध्ये अनेक रुग्णांचा मृत्यू होत असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. यासंदर्भात बोलतांना न्यायालयाने ‘ऑक्सिजन बँक’सारखी पद्धत चालू करण्याचा सल्ला दिला. काही ठराविक ठिकाणी ऑक्सिजनचा साठा करून तुटवडा जाणवू लागल्यास तेथून ऑक्सिजन पुरवठा करता येईल, अशी यंत्रणा उभारण्याविषयी मत व्यक्त केले.

२. या वेळी केंद्र सरकारने म्हटले की, महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजनचा वापर अल्प होत असेल, तर ऑक्सिजनचे काही टँकर देहलीमध्ये पाठवू शकतो. आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर आमचा अहवाल सादर करणार आहोत.