बेंगळुरू येथे स्मशानभूमी बाहेर ‘हाऊस फुल’चा फलक !

‘भारतात अशी स्थितीही येईल’, असे कुणाला वाटले नव्हते; मात्र आपत्काळ येणार आहे, असे द्रष्टे, संत आदी सांगत होते, तेच अशा घटनांतून दिसत आहे !

बेंगळुरू (कर्नाटक) – कोरोनाच्या संसर्गामुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीमध्ये अनेक घंटे रांगेत उभे रहावे लागत आहे. चामराजपेटमधील एका स्मशानभूमीबाहेर चक्क ‘हाऊस फुल’ असा फलकच लावण्यात आला आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने हा फलक लावण्यात आला आहे. स्मशानभूमीत २० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी नवीन मृतदेह घेण्यास नकार दिला जात आहे. बेंगळुरूमध्ये अशा १३ स्मशानभूमी आहेत, जिथे विद्युत् शवदाहिन्या आहेत; मात्र मृतांची संख्या वाढल्याने अंत्यसंस्कारासाठी बराच वेळ वाट पहावी लागत आहेत.

सूरत येथे मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठी रांगा

सूरत येथे लोकांना कोरोनामुळे मृत झालेल्या त्यांच्या नातेवाइकांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. ते मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या बाहेर मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत. शहरातील मृतांची संख्या पुष्कळ अधिक आहे.