चामराजनगर (कर्नाटक) येथे ऑक्सिजन पोचायला उशीर झाल्याने रुग्णालयातील २४ कोरोनाबाधितांचा मृत्यू !

यामागे मानवी चूक कारणीभूत असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !

म्हैसूरू (कर्नाटक) – राज्यातील चामराजनगर येथील रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे २४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर म्हैसूर येथून चामराजनगर येथे २५० ऑक्सिजन सिलिंडर पाठवण्यात आले आहेत. चामराजनगर रुग्णालयाला बेल्लारी येथून ऑक्सिजन मिळणार होता; मात्र ऑक्सिजन येण्यास उशीर झाला. यामुळे ही दुर्घटना घडली.

मृत्यू झालेल्यांतील अधिकांश रुग्ण हे व्हेंटिलेटरवर होते. ऑक्सिजनचा पुरवठा थांबल्यानंतर ते तळमळू लागले आणि त्यांचा मृत्यू झाला. यापूर्वी कलबुर्गी येथील के.बी.एन्. रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. तसेच यदगीर सरकारी रुग्णालयात वीज गेल्याने व्हेंटिलेटरवर असलेल्या एका रुग्णाचाही मृत्यू झाला होता.

कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले की, चामराजनगर येथील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मी मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा केली आहे. मी म्हैसूरू, मंड्या आणि चामराजनगर येथे जाऊन एकूण परिस्थितीचा आढावा घेईन अन् समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीन.