पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडून परमबीर सिंह यांचे अन्वेषण करण्यास नकार !

पोलीस महासंचालक संजय पांडे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह 

मुंबई – पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी गृहविभागाला पत्र लिहून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे अन्वेषण करण्यास नकार कळवला आहे. पांडे यांनी नकार का दिला ? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही; मात्र यातून केंद्र आणि राज्य शासन यांच्यातील अंतर्गत कुरघोड्या पुढे आल्या आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचा आदेश दिला असल्याचा आरोप मागे घेण्यासाठी संजय पांडे माझ्यावर दबाव टाकत आहेत, अशी याचिका परमबीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेवर ५ मे या दिवशी सुनावणी होणार आहे. पोलीस अधिकारी अनुप डांगे यांनी परमबीर सिंह यांचे गुन्हेगारी जगताशी संबंध असल्याचा आरोप केला आहे, तसेच निलंबनाच्या कारवाईनंतर पुनर्नियुक्तीसाठी त्यांनी माझ्याकडे २ कोटी रुपयांची मागणी केली होती, असे गंभीर आरोप केले आहेत. याविषयी डांगे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी परमबीर सिंह यांचे प्राथमिक अन्वेषण करण्याचा आदेश गृहविभागाकडून संजय पांडे यांना देण्यात आला आहे.