राज्यात आढळली २५ सहस्र शाळाबाह्य बालके !

कोरोनाच्या संसर्गामुळे ५ विभागांत शोध मोहीम नाही

राज्यातील मोठे ५ विभाग वगळता सहस्रो बालके शाळाबाह्य असणे गंभीर आहे. अशीच स्थिती राहिली तर देश विकासाच्या दिशेने कसा जाणार ? यावर लवकरात लवकर उपाय काढणे आवश्यक आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

सोलापूर – राज्यातील शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या वतीने १ ते १० मार्च या कालावधीत विशेष शोध मोहीम घेण्यात आली. यात राज्यभरातून २५ सहस्र २०४ शाळाबाह्य मुले सापडली आहेत. यामध्ये मुंबई उपनगरांमध्ये सर्वांत अधिक १० सहस्र १७७ मुले, तर वाशिममध्ये सर्वांत न्यून १३ मुलांची नोंदणी झाली आहे. सोलापूर येथे २४९ मुले आढळली असून कोरोनामुळे काही विभागांमध्ये शोध मोहिमेला अनुमती देण्यात आली नाही.

बालकांची ‘विनामूल्य आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार’च्या अधिनियमानुसार ६ ते १४ वर्षे वयोगटातील शाळेत भरती न झालेली, शाळेत न जाणारी किंवा ज्या बालकांनी प्रवेश घेऊन प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले नाही, अशा बालकांचा शोध घेण्यात येतो. प्रतिवर्षी फेब्रुवारीमध्ये होणारी मोहीम यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे मार्चमध्ये घेण्यात आली.

कोरोनाच्या संसर्गामुळे या ठिकाणी झाली नाही शोधमोहीम

संभाजीनगर, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांत, तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिका क्षेत्रांत कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर मोहीम राबवण्यात आली नाही. त्यामुळे येथील शाळाबाह्य मुलांची आकडेवारी अद्याप स्पष्ट झालेली नाही.