फोन टॅपिंगचे प्रकरण
मुंबई – राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे अन्वेषणासाठी येण्यास नकार दिला आहे. ‘अन्वेषण करणार्या अधिकार्यांनी ई मेलद्वारे प्रश्न पाठवल्यास त्यांची ई मेलवरून उत्तरे देईन’, असे उत्तर शुक्ला यांनी पाठवले आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईत चौकशीसाठी उपस्थित राहू शकणार नाही : रश्मी शुक्ला #MumbaiPolice #RashmiShukla #ABPMajha https://t.co/EhIPmqUV9Y
— ABP माझा (@abpmajhatv) April 28, 2021
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असतांना वर्ष २०२० मध्ये रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन पोलीस महासंचालकांना राज्यातील पोलिसांच्या स्थानांतरामध्ये आर्थिक व्यवहार होत असल्याचे पत्र लिहिले होते. या पत्रासमवेत त्यांनी काही ‘फोन टॅपिंग’ही सादर केले होते. यांतील काही ‘फोन टॅपिंग’साठी त्यांनी अनुमती घेतली नसल्याचा ठपका गृहविभागाने घेतला आहे. या प्रकरणी सायबर विभागाने रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी अन्वेषणाला उपस्थित रहावे, यासाठी सायबर विभागाकडून शुक्ला यांना समन्स पाठवण्यात आला आहे. रश्मी शुक्ला सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलात प्रतिनियुक्तीवर असून भाग्यनगर येथे आहेत. रश्मी शुक्ला यांनी लिहिलेले पत्र आणि ‘फोन टॅपिंग’ यांच्या आधारे मागील मासात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘सत्ताधारी पक्षाकडून कोणती कारवाई करण्यात आली ?’, असा प्रश्न उपस्थित केला होता. हे पुरावे फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांकडे सादर करून अन्वेषणाची मागणी केली आहे. यामध्ये काही राजकीय नेते आणि पोलीस अधिकारी यांचाही समावेश असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. यावरून राज्यशासन आणि केंद्रशासन यांच्यामध्ये कुरघोडीचे राजकारण चालू आहे.