वीजग्राहकांनी स्वत: वीजमीटरचे रिडिंग पाठवण्याचे महावितरणचे आवाहन

रिडिंग पाठवण्यासाठी भ्रमणभाष अ‍ॅप किंवा वेबसाईट यांची सोय उपलब्ध

सिंधुदुर्ग – सध्या कोरोना विषाणूची दुसरी लाट चालू असल्याने संचारबंदी आहे, तसेच अनेक भाग आणि सोसायट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी महाराष्ट्र राज्य कंपनीला (महावितरणला) प्रत्यक्ष मीटर रिडिंग घेणे शक्य न झाल्यास वीजग्राहकांनी महावितरणचे मोबाईल अ‍ॅप किंवा www.mahadiscom.in ही वेबसाईट यांद्वारे स्वतःहून मीटर रिडिंग पाठवावे. वीजग्राहकांनी स्वतःहून प्रतिमाह मीटर रिडिंग पाठवण्याची सोय आणि त्यासाठी ४ दिवसांचा कालावधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महावितरणकडून केंद्रीकृत वीजदेयक प्रणाली (सेंट्रलाईज बिलिंग सिस्टीम) चालू करण्यात आल्यानंतर प्रत्येक मासाच्या १ ते २५ दिनांकापर्यंत एका निश्‍चित दिनांकाला लघुदाब वीजग्राहकांकडील मीटरचे छायाचित्र (फोटो) रिडिंग घेण्यात येत आहे. मासात रिडिंगसाठी निश्‍चित केलेला दिनांक आणि मीटर क्रमांक ग्राहकांच्या वीजदेयकांवर नमूद आहे. रिडिंगच्या निश्‍चित केलेल्या दिनांकाच्या एक दिवसआधी महावितरणकडून सर्व ग्राहकांना स्वतःहून रिडिंग पाठवण्याची लघुसंदेशाद्वारे (‘एस्.एम्.एस्.’द्वारे) प्रतिमाह विनंती करण्यात येत आहे. हा संदेश मिळाल्यापासून ४ दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून भ्रमणभाष अ‍ॅप किंवा संकेतस्थळ यांद्वारे रिडिंग पाठवता येईल.

ग्राहकांनी स्वतःहून मीटर रिडिंग पाठवल्यामुळे त्यांचे त्यांच्या मीटरकडे आणि रिडिंगकडे नियमित लक्ष राहील. त्यामुळे वीजवापरावर देखील नियंत्रण राहील. रिडिंगनुसार देयक आल्याची निश्‍चिती करता येईल. मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास त्याची तात्काळ तक्रार करता येईल. वीजदेयकाविषयी कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत. रिडिंग अचानक वाढल्यास त्याची कारणे शोधता येतील. शंका-समाधानासाठी तक्रार करता येईल. या आणि इतर विविध लाभांमुळे वीजग्राहकांनी स्वतःहून प्रतिमाह मीटर रिडिंग पाठवावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.