लोकांनी कोविड नियमांचे पालन करावे; मगच सरकारला दोष द्यावा !

संभाजीनगर खंडपिठाच्या बेशिस्त नागरिकांना कानपिचक्या

संभाजीनगर – स्वतः जिथे रहातो त्या ठिकाणाविषयी थोडीफार निष्ठा, संवेदनशीलता दाखवली पाहिजे. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असतांना त्याचे सरकारवर खापर फोडण्याआधी नागरिकांनी स्वत: संयम आणि शिस्त पाळली पाहिजे, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने कोविड नियमांचे पालन न करता बेशिस्तपणे वावरणार्‍या नागरिकांना कानपिचक्या दिल्या आहेत. मास्कचा केवळ शोभेपुरता वापर करून फिरणार्‍या व्यक्ती कोरोनाच्या सुपरस्प्रेडर ठरू शकतात. असे लोक आणि कोविड नियमांचे सक्तीने पालन करण्यासाठी कार्यरत पोलिसांवर दबाव आणणार्‍या लोकप्रतिनिधींवर गुन्हे नोंद करा, असा आदेश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती बी.यू. देबडवार यांनी २६ एप्रिल या दिवशी प्रशासनाला दिले, तसेच शहरातील विद्युत् शवदाहिनीसंबंधी कृती आराखडा सिद्ध करण्याचे आणि ग्रामीण भागात अँटिजन चाचण्या वाढवण्याचे निर्देशही खंडपिठाने दिले आहेत.

कोरोनाच्या काळात होणारा रेमडेसिविरचा काळाबाजार, कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कारांसाठी नातलगांची होणारी फरपट, विद्युत् शवदाहिनीचे रखडलेले काम आदी विषयांच्या माध्यमांत आलेल्या बातम्यांचा आधार घेऊन खंडपिठाने फौजदारी सुमोटो (स्वतःहून याचिका प्रविष्ट करणे) याचिका प्रविष्ट करून घेतली होती. त्यावर ही सुनावणी झाली. त्या वेळी न्यायमूर्तींनी महामारी रोखण्यासाठी प्रशासन आणि नागरिक यांसाठी नवीन आचारसंहिता घालून दिली, तसेच राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, अन्न आणि औषधी प्रशासनाचे प्रधान सचिव, केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव आदींना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. त्यांना ३ मे या दिवशी म्हणणे सादर करण्याचे आदेशही खंडपिठाने दिले आहेत.