नगर येथील पशूवधगृहातून ३०० किलो गोवंशियांचे मांस जप्त

प्रतिकात्मक चित्र

गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता प्रतिपादित करणारी घटना !

२४ गोवंशियांची सुटका

नगर, २८ एप्रिल – सध्या दळणवळण बंदीचे कडक निर्बंध असले, तरी शहरातील झेंडीगेट भागातील अवैध पशूवधगृहे राजरोसपणे चालू असल्याचे आढळून आले आहे. नगर शहराचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे आणि कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या पथकाने २५ एप्रिलला रात्री उशिरा येथे धाड टाकून ३०० किलो मांस जप्त केले, तसेच २४ गोवंशियांची सुटका केली. त्यांच्याकडून अनुमाने २ लाख ९० सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी इसरार उपाख्य इच्चु मुक्तार कुरेशी, तबरेज आबीद कुरेशी, मुज्जु जानेमीया कुरेशी आणि तौफिक युनिस कुरेशी या चौघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अनेकदा कारवाई होऊनही या भागात अवैध पशूवधगृहेे चालूच आहेत.

आरोपी ग्रामीण भागातून जनावरे खरेदी करून आणतात. वाहतूक करतांना संशय येऊ नये, यासाठी जनावराच्या मालकाला सोबत आणले जाते. यातील अनेक पशूवधगृह चालकांचे पोलिसांशी अर्थपूर्ण संबंध असल्याची चर्चा होते. त्यामुळे अधूनमधून अशी कारवाई होत असली, तरी पशूवधगृहे पुन्हा चालू होतात. नगर शहर आणि संगमनेरहून मोठ्या प्रमाणात जनावरांचे मांस मुंबईला पाठवण्यात येते. स्वस्तात जनावरे खरेदी करून मोठ्या प्रमाणावर पैसा मिळवण्याच्या या व्यवसायात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी जम बसवला असल्याचे सांगण्यात येते.

(निष्क्रीय आणि भ्रष्ट पोलीस प्रशासन यांच्यामुळेच गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही असे जनतेला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक)