कोरोनाच्या काळात भारतीय सैन्याचे साहाय्य घेऊ शकतो का ? – सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्‍न

‘ही राष्ट्रीय आणीबाणीची परिस्थिती नाही तर काय आहे ?’, असाही न्यायालयाचा प्रश्‍न

सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – भारतीय सैन्य, अर्धसैनिक दल, तसेच भारतीय रेल्वेचे डॉक्टर केंद्राच्या अखत्यारीत येतात. अशा वेळी ‘क्वारंटाईन’, लसीकरण किंवा इतर ठिकाणी त्यांचे साहाय्य घेऊ शकतो का ? यावर राष्ट्रीय योजना काय आहे ?, असे प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारले. ‘सध्या लसीकरण फार आवश्यक बनले आहे. लसीच्या मूल्यावर केंद्र काय करत आहे ?’, असा प्रश्‍नही न्यायालयाने या वेळी विचारला. कोरोनाच्या वाढत्या संकटाला तोंड देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे ठोस राष्ट्रीय योजनेची मागणी केली होती. यावर २७ एप्रिल या दिवशी सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान सरकारकडून त्यांची योजना सादर करण्यात आली; मात्र यावर सर्वोच्च न्यायालयाने असमाधान व्यक्त करत वरील प्रश्‍न विचारले.

१. न्यायालयाने पुढे ‘ही राष्ट्रीय आणीबाणीची परिस्थिती नाही तर काय आहे ?’ लसीच्या वेगवेगळ्या मूल्यावर केंद्राची भूमिका काय ?’ असेही प्रश्‍न उपस्थित केले. सुनावणीच्या वेळी ऑक्सिजन आणि लसी यांच्या पुरवठ्यावरही चर्चा झाली.

२. न्यायालयाने पुढे म्हटले की, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीचा अर्थ वेगवेगळ्या उच्च न्यायालयांत चालू असलेली सुनावणी रोखणे, असा होत नाही. उच्च न्यायालयांना स्थानिक परिस्थितीची जाण अधिक चांगल्या पद्धतीने असते. राष्ट्रीय सूत्रांची नोंद घेणे, हे सर्वोच्च न्यायालयासाठी आवश्यक आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालय केवळ बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही. आम्ही राज्यांमधील समन्वय निर्माण करण्याचे काम करू.

३. सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना आरोग्याच्या पायाभूत सुविधांसंबंधी माहिती देण्यास सांगितले असून ३० एप्रिल या दिवशी पुढील सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश

१. ऑक्सिजनच्या पुरवठ्याविषयी केंद्राला सध्याची स्थिती स्पष्ट करावी लागेल. किती ऑक्सिजन आहे ? राज्यांची आवश्यकता किती आहे ? केंद्रातून राज्यांना ऑक्सिजन वाटपाचा आधार काय आहे ? राज्यांना याची किती आवश्यकता आहे ?, हे वेगाने जाणून घेण्यासाठी कोणती प्रक्रिया अवलंबली गेली आहे ?

२. भारतीय जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे लक्षात घेऊन आरोग्यविषयक सेवा वाढवल्या पाहिजेत. कोविड बेड्स वाढवा.

३. अशी पावले सांगा जे रेमडेसिवीर आणि फेवीप्रिवीर सारख्या आवश्यक औषधांची कमतरता पूर्ण करण्यासाठी उचलण्यात आले.