‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळे’च्या निमित्ताने रामनाथी आश्रमात आलेल्या शिबिरार्थींनी व्यक्त केलेले अभिप्राय

१७ ते १९.१.२०२० या कालावधीत सनातनच्या रामनाथी आश्रमात ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा’ झाली. त्या वेळी शिबिरार्थींना आलेल्या अनुभूती आणि त्यांनी व्यक्त केलेले अभिप्राय पुढे दिले आहेत.

१. आश्रम एखाद्या मंदिराप्रमाणे वाटणे

‘आश्रम पाहिल्यावर मला एका मंदिरात आल्यासारखे वाटले. स्वागतकक्षाच्या बाहेरील लादीवर पाण्यासारख्या लहरी दिसतात. त्या वेळी ‘मी त्या पाण्यावरच चालत आहे’, असे मला जाणवले. ‘आश्रमातील साधक आणि साधिका ईश्‍वरी सेवेत मग्न आहेत’, असे मला वाटले.’ – श्री. विशाल हब्बा, सोलापूर

२. ‘आश्रमात दैवी शक्ती आहे’, असे जाणवले !

‘आश्रमात आल्यावर मनातील अनेक नकारात्मक विचार न्यून होऊन मन निर्विचार झाले. ‘आश्रमात दैवी शक्ती आहे’, असे जाणवले. आश्रमातील काही खोल्यांकडे बघतांना ‘येथे देवता रहातात’, असे मला वाटले.’ – श्री. शिवाजी चिंता, सोलापूर

३. आश्रमात मनाला एकाग्रता लाभली !

‘ या आधी मी पुष्कळ देवदर्शन केले; पण इथे (आश्रमात) माझ्या मनाला एकाग्रता लाभली. आता अन्य कोणत्या गोष्टींची आठवण येत नाही. माझ्या जीवनात नवचैतन्य प्राप्त झाले आहे.’ – श्री. मनोज मनोहरराव फुलारी, कारंजा (लाड), जि. वाशिम.

४. एक सर्वोत्तम तीर्थक्षेत्र म्हणजे सनातनचा रामनाथी आश्रम !

‘आश्रमात आल्यावर ‘हिंदु राष्ट्र कसे असेल ?’ हे अनुभवायला मिळाले. मी तेथील सेवा आणि स्वच्छता यांचे नियोजन पाहिले. त्या वेळी या सेवांमुळे ‘प्रत्येकाची क्षमता आणि कौशल्य वाढवण्यासाठी, तसेच ईश्‍वराचे गुण येण्यासाठी साहाय्य होते’, हे मला शिकायला मिळाले. ‘प.पू. गुरुदेवांनी सर्व प्राणिमात्रांसाठी निर्माण केलेले एक सर्वोत्तम तीर्थक्षेत्र म्हणजे सनातनचा रामनाथी आश्रम होय !’

४ अ. ‘अनिष्ट शक्तींवर मात करण्यासाठी ईश्‍वर कशा प्रकारे साहाय्य करतो’, ते लक्षात येणे : ‘धर्मकार्यामध्ये अनिष्ट शक्ती कशा प्रकारे त्रास देतात ?’, ते पहायला मिळाले. त्याचप्रमाणे ‘या अनिष्ट शक्तींवर मात करण्यासाठी ईश्‍वर कशा प्रकारे साहाय्य करतो’, तेही लक्षात आले. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे प.पू. गुरुदेवांनी वापरलेला तेजतत्त्वाने भारित झालेला आरसा, हे होय.’ – श्री. दिनेश सीताराम कडव, मु. जालगाव, आनंदनगर, ता. दापोली, जि. रत्नागिरी.

५. आश्रमात आल्यावर मनात सकारात्मक विचार येऊ लागले !

‘आश्रमाच्या परिसरात आल्यावर आनंदावस्था प्राप्त झाल्यासारखे जाणवले. माझी वृत्ती अंतर्मुख होऊन मी भावूक झालो. ‘हिंदु राष्ट्र म्हणजे नक्की काय असेल ? हिंदु राष्ट्रात, म्हणजेच रामराज्यात प्रजा कशी असेल ?’, याची मला जाणीव झाली. आश्रमात आल्यावर मनात सकारात्मक विचार येऊ लागले.’ – श्री. ऋतुराज गोडसे, वळसे, सातारा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक