सोलापूर येथे रेल्वे विभागाकडून ‘आयसोलेशन वॉर्ड’च्या निर्मितीसाठी ५७ कोच दाखल !

सोलापूर – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रेल्वेकडून ‘आयसोलेशन वॉर्ड’च्या निर्मितीसाठी ५७ कोच दाखल झाले आहेत. यामध्ये ५१३ रुग्णांची व्यवस्था होणार असून याचे काम चालू करण्यात आले आहे. वर्ष २०२० मध्ये कोरोनाला प्रारंभ झाल्यापासून रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत गेली. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वे बोगीत आयसोलेशन कोच बनवले होते; मात्र मागील वर्षी या कोचचा वापर झाला नाही.

मागील वर्षी सिद्ध करण्यात आलेले कोच सोलापूर विभागात धूळ खात पडून होते. (एकीकडे ऑक्सिजन आणि खाटा अभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे, तर दुसरीकडे अशा प्रकारे सिद्ध करण्यात आलेले डबे धूळखात पडून रहातात, हे दुर्दैवी आहे. प्रशासनाने योग्य तो समन्वय साधून या गोष्टींचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. – संपादक) आता सर्व डबे एकत्र करून डब्यांची पहाणी करण्यात येणार आहे, तर काही डब्यांची दुरुस्ती करून ते कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी दिले जाणार आहेत. या कोचचे वैशिष्ट्य म्हणजे एका कोचमध्ये नऊ रुग्णांवर उपचार होणार असून रुग्णालयांवरील ताण न्यून होणार आहे. प्रत्येक डब्यात ऑक्सिजन ठेवण्याची व्यवस्था असणार आहे, तसेच डॉक्टरांना बसण्यासाठी स्वतंत्र सोय असणार आहे.