५४ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चोपडा (जिल्हा जळगाव) येथील चि. किमया प्रशांत पाटील (वय १ वर्ष) !

चोपडा, जळगाव येथील चि. किमया प्रशांत पाटील हिचा चैत्र शुक्ल पक्ष सप्तमी या तिथीला, म्हणजे १९.४.२०२१ या दिवशी प्रथम वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

चि. किमया पाटील

चि. किमया प्रशांत पाटील हिला प्रथम वाढदिवसाप्रीत्यर्थ सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. गरोदरपण    

१ अ. भावपूर्ण प्रार्थना आणि नामजप यांमुळे बाळाभोवती, तसेच स्वतःभोवती सुरक्षाकवच निर्माण होत असल्याचे जाणवणे : ‘मला दिवस गेले आहेत’, हे समजल्यावर ‘देवाने चांगला साधक घडवण्याची संधी दिली आहे’, असे वाटून मला पुष्कळ आनंद झाला. ‘देवा, आम्हाला सद्गुणी, धर्माचरणी, आरोग्यसंपन्न, धर्मप्रसार आणि साधना करणारे मूल होऊ दे’, अशी प्रार्थना माझ्याकडून सतत होऊ लागली. गरोदरपणात मला ‘नामजप करावा, संत भक्तराज महाराज यांची भजने, देवतांची आरती, तसेच श्रीकृष्णाची भजने ऐकावीत’, असे वाटायचे. बाळकृष्णाच्या लीला बघायलाही आवडायचे. मी पोटावर हात ठेवून नामजप करतांना बाळाची पुष्कळ हालचाल व्हायची. तेव्हा ‘बाळ नामजपाला प्रतिसाद देत आहे’, असे मला जाणवायचे. या सगळ्यामुळे ‘बाळाभोवती आणि माझ्याभोवती सुरक्षाकवच निर्माण होत आहे’, असे मला जाणवायचे.

१ आ. सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचे वाचन करतांना ‘रामनाथी आश्रमात आहे’, असे जाणवून दिवसभर मन प्रसन्न आणि आनंदी रहाणे : मी सनातनने प्रकाशित केलेल्या ‘आपले बाळ – जन्म ते १ वर्ष’ आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथांचे वाचन केले. ग्रंथ वाचतांना ‘मी आणि बाळ रामनाथी आश्रमातच आहोत’, असे मला वाटायचे. दिवसभर माझे मन प्रसन्न, उत्साही आणि आनंदी रहायचे. ग्रंथ आणि गीता वाचत असतांना बाळ हळूवारपणे हालचाल करत असे. तेव्हा ‘बाळ ग्रंथातील आणि गीतेतील सार श्रवण करत आहे’, असे मला जाणवायचे. तेव्हा माझ्याकडून गुरुदेवांना शरणागत अन् कृतज्ञता भावाने प्रार्थना व्हायची.

२. बाळाचा जन्म

२ अ. आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्म करण्यास सांगितल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करणे आणि मुलगी झाल्याचे कळल्यावर ‘आपल्या घरात लक्ष्मी आली’, असे वाटूून आनंद होणे : मी प्रसुतीसाठी रुग्णालयात गेल्यावर आधुनिक वैद्यांनी मला सांगितले, ‘‘तुमचे शस्त्रकर्म करावे लागेल; कारण तुमचा रक्तदाब उच्च असून शरिरावर सूज आहे आणि बाळाचे वजन ३ किलोपेक्षा अधिक आहे.’’ त्या वेळी मी गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘हे गुरुमाऊली,शस्त्रकर्म करणार्‍या आधुनिक वैद्यांच्या रूपात तुम्हीच येऊन माझे शस्त्रकर्म सुरळीतपणे करून घ्या.’ शस्त्रकर्म झाल्यावर मी शुद्धीवर आले, तेव्हा मला मुलगी झाल्याचे कळले. ‘आपल्या घरात लक्ष्मी आली’, असे जाणवून मला आणि परिवारातील सर्वांना पुष्कळ आनंद झाला.’

– सौ. कल्याणी पाटील (चि. किमयाची आई)

२ आ. जन्म ते ७ मास

२ आ १. शांत : ‘किमया पुष्कळ शांत आहे. त्यामुळे आमचे शेजारी म्हणतात, ‘‘तुमच्या घरात लहान बाळ आहे’, असे वाटतच नाही.’’

२ आ २. श्रीकृष्णाचा पाळणा ऐकून झोपणे : किमया नेहमी ‘सनातन चैतन्यवाणी’ या अ‍ॅपवरील श्रीकृष्णाचा पाळणा ऐकूनच झोपते. झोपेतून उठल्यावर तिचा तोंडवळा प्रसन्न आणि हसतमुख असतो.

२ आ ३. नामजपाची आवड : आम्ही प्रतिदिन सकाळी भ्रमणभाषवर दुर्गादेवीचा नामजप लावतो. तो नामजप किमया शांतपणे ऐकते. ती रडत असतांना तिच्या जवळ जाऊन नामजप केल्यावर ती रडायची थांबते आणि शांत होते.

२ आ ४. सकाळी अंघोळ करून आरतीला उपस्थित रहाणे : किमयाला पहाटे लवकर अंघोळ करायला आवडते. अंघोळ करून सकाळी ७ वाजता ती आरतीला उपस्थित असते. आरती चालू असतांना ती स्मरणिकेवरील गुरुदेवांचे छायाचित्र आणि श्रीकृष्णाचे चित्र यांकडे एकटक पहात असते. ती पुष्कळ हसून आनंद व्यक्त करते आणि टाळ्या वाजवते. ‘ज्योत से ज्योत जगावो…।’ ही गुरुदेवांची आरती चालू झाली की, किमयाला फार आनंद होतो.

२ आ ५. शेषशय्येवर पहुडलेल्या श्रीविष्णुप्रमाणे मुद्रा करणे : किमया खेळतांना ‘शेषशय्येवर श्रीविष्णु डोक्याखाली एक हात ठेवून विश्राम करत आहे’, अशी मुद्रा करते. तिचे ते मनमोहक आणि तेजस्वी रूप बघून कोणीही मंत्रमुग्ध होते.

२ आ ६. लक्ष्मीपूजन आणि नवरात्री या वेळी किमयाने आनंदाने पूजा करून घेणे : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळपासून आणि संध्याकाळी लक्ष्मीपूजन करतांना ती पुष्कळ आनंदी होती. मी तिचे पूजन केले, तेव्हा तिने ते आनंदाने करू दिले. नवरात्रीत नऊ दिवस ‘कुमारिका पूजन’ म्हणून स्त्रिया किमयाचे पूजन करायच्या. त्या वेळी ती कपाळाला हळद, कुंकू आणि अक्षता शांतपणे लावून घ्यायची अन् प्रसन्नतेने पूजा करू द्यायची.’

– सौ. कल्याणी आणि श्री. प्रशांत पाटील (चि. किमयाचे आई-वडील)

२ आ ७. किमयाच्या आजीच्या तळहातावरील बिंदू दाबलेले पाहून किमयानेही आजीच्या तळहातावरील बिंदू दाबणे : ‘१६.११.२०२० या दिवशी किमयाच्या आजीला अस्वस्थ वाटत होते. तिने मला तिचे बिंदूदाबन करण्यास सांगितले. मी तिच्या हातावरील बिंदू दाबत होतो. तेव्हा किमया माझ्या जवळच बसली होती आणि माझ्याकडे लक्ष देऊन बघत होती. नंतर तिने तिच्या आजीचा हात बळजोरीने स्वतःच्या हातात घेतला आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने ती आजीच्या तळहातावरील बिंदू दाबू लागली.’ – श्री. शांताराम पाटील (चि. किमयाचे आजोबा)

३. स्वभावदोष 

‘मनाविरुद्ध घडल्यास चिडचिड करणे.

असे सद्गुणी बाळ दिले. यासाठी आम्ही श्री गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. प्रशांत पाटील आणि सौ. कल्याणी पाटील, चोपडा, जळगाव. (९.३.२०२१)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.