‘आपत्कालीन स्थितीत आणि रुग्णाईत असतांनाही सेवा करवून घेणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांची पू. शिवाजी वटकर यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

पू. शिवाजी वटकर

१. पूर्वीपासून करत असलेली हिंदु जनजागृती समितीच्या ‘हेल्पलाईन’ची सेवा !

‘गुरुकृपेने मला वर्ष २००५ पासून हिंदु जनजागृती समितीच्या ‘हेल्पलाईन’ची सेवा मिळाली आहे. या सेवेच्या अंतर्गत मला देशभरातून आणि काही वेळा विदेशातून जिज्ञासूंचे दूरध्वनी येतात. त्यांना धर्म, साधना किंवा अन्य काही माहिती हवी असेल, तर मी त्यांना देतो. त्यांना कार्यात सहभागी व्हायचे असेल, तर मी त्यांना त्यांच्या जिल्ह्याशी संबंधित ‘हिंदु जनजागृती समिती’च्या समन्वयकांशी जोडून देतो. समाजातील धर्माभिमानी, जिज्ञासू, राष्ट्रप्रेमी इत्यादी मला संपर्क करतात. त्या वेळी मला त्यांच्याकडून शिकायला मिळते, तसेच समितीच्या साधकांच्या संपर्कामध्ये असतांना त्यांचा सत्संग मिळतो.

२. पाठीच्या मणक्यांच्या त्रासामुळे झोपून रहाणे आणि त्यामुळे व्यष्टी साधनेचे प्रयत्न अन् समष्टीसाठी नामजप एवढेच करू शकणे

माझे वय ७३ वर्षे आहे. परात्पर गुरुदेवांनी मला हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा अनुभव मागील १६ वर्षांपासून दिला आहे. एप्रिल आणि मे २०२० या २ मासांत (महिन्यांत) मला पाठीच्या मणक्यांचा (सायटिका) त्रास होत होता. मला बसता किंवा उभे रहाता येत नव्हते. मला सतत झोपून रहावे लागत असल्याने बाहेर जाऊन धर्मप्रसार करता येत नाही. मी केवळ व्यष्टी साधनेचे प्रयत्न आणि समष्टीसाठी नामजप करणे, एवढेच करत आहे. अशा वेळी ‘श्री गुरु माझ्याकडून ही ‘हेल्पलाईन’ची सेवा करवून घेत आहेत, ही त्यांची माझ्यावरील आशीर्वादरूपी गुरुकृपाच आहे’, असे मला वाटते.

३. रुग्णाईत असतांनाही सेवेची काळजी घेऊन साधना करवून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

कोरोना विषाणूंच्या संसर्गाने जगभर हाहाःकार माजला आहे. देशभर दळणवळण बंदी असल्याने लोकांना घराबाहेर पडता येत नाही. सध्या सर्वजण संपर्कासाठी सामाजिक माध्यमांचा (सोशल मिडियाचा) उपयोग करत आहेत. २९.३.२०२० पासून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ नामसत्संग, भावसत्संग, बालसंस्कार वर्ग आणि धर्मसंवाद (धर्मचर्चा) आयोजित करण्यात येत आहेत. या प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेस संपर्कासाठी माझ्याकडील ‘हेल्पलाईन’चा दूरध्वनी क्रमांक दिला आहे. त्यामुळे मला दिवसभर दूरध्वनी येतात. मी रुग्णाईत असलो, तरी ‘जिज्ञासूंचे दूरध्वनी घेणे, त्यांचे शंकानिरसन करणे, लघुसंदेश पाठवून त्यांना जिल्ह्यांतील समन्वयकांशी जोडून देणे’, हे मला करता आले. तेव्हा ‘मी रुग्णाईत असूनही परात्पर गुरुदेव माझ्या सेवेची काळजी घेऊन माझी साधना कशी करवून घेतात’, हे मला शिकायला मिळाले.

४. हिंदु जनजागृती समितीच्या ‘हेल्पलाईन’वर आलेले विविध जिज्ञासूंचे दूरध्वनी

हिंदु जनजागृती समितीच्या ‘हेल्पलाईन’वर मला आर्त, जिज्ञासू, बालसंस्कार पहाणारी मुले, पोलीस, संघटनांचे प्रमुख यांचसमवेत पुरोगामी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि धर्मद्रोही यांचेही दूरध्वनी आले. त्यांपैकी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

४ अ. आर्त : ‘ऑनलाईन’ नामसत्संग झाल्यावर काही जणांनी मला दूरध्वनी करून त्यांच्या कुटुंबातील अडचणी सांगितल्या. काहींनी मला त्यांच्या व्यावहारिक अडचणी सांगितल्या. त्यावर त्यांना ‘कुलदेवता आणि दत्त’ यांचा नामजप कसा उपयोगी पडू शकतो ?’, हे मला गुरुकृपेने सांगता आले.

‘ज्योतिष, हस्तरेषा अन् भविष्य पहाणे’ हा विषय धर्मसत्संगात झाल्यावर काही जणांनी त्यांची हस्तरेषा आणि कुंडली पाहून मला भविष्य सांगण्याची विनंती केली. भविष्य पहाण्यासाठी मी त्यांना स्थानिक लोकांचे साहाय्य घेण्याचे सुचवू शकलो. त्यांना ‘तुम्ही स्वतः नामजप आणि साधना चालू केलीत, तर तुम्ही स्वावलंबी होऊन तुम्हाला तुमच्या समस्यांवर मात करता येईल’, हे मला सांगता आले.

४ आ. जिज्ञासू : काही जणांनी नामजप चालू केला होता. त्यांनी त्यांना अनुभूती आल्याचे सांगितले, तर काही जणांना कुलदेवतेचा नामजप चालू केल्यावर त्रास होत असल्याने त्यांनी त्याविषयी विचारले. काहींनी ‘नामजप बसूनच आणि जपमाळ घेऊनच केला पाहिजे का ?’, याविषयी विचारलेल्या शंकांचे निरसन मला परात्पर गुरुदेवांनी शिकवलेल्या ज्ञानामुळे करता आले.

४ इ. साधक : ऑनलाईन सत्संगाविषयी चांगला अभिप्राय देतांना काही जणांचा भाव जागृत होत होता. लहान मुलेही बालसंस्कार वर्गाविषयी चांगले अभिप्राय देत होती. बालसंस्कारवर्ग पाहिल्यावर लहान मुलांच्यात झालेले पालट पाहून त्यांच्या पालकांनी साधना आणि सेवा करण्याचे ठरवले.

४ इ १. वैशिष्ट्यपूर्ण संपर्क : जम्मू येथील एका गृहस्थांचा मला दूरध्वनी आला. त्यांनी मला सांगितले, ‘‘माझ्या घरात देवघर आहे. माझी मुले आणि कुटुंबीय यांच्यावर धर्मसंस्कार व्हावेत; म्हणून मी प्रतिदिन पूजा-अर्चा करतो. आता ‘ऑनलाईन’ नामजप सत्संग पाहिल्यावर मी कुलदेवता आणि श्री गुरुदेव दत्त यांचे नामस्मरण चालू केले आहे. माझे एक गुरु आहेत. त्यांनी मला सांगितले, ‘‘हे सर्व तू बंद कर आणि मी दिलेला ‘अहं ब्रह्मास्मि ।’ हाच नामजप कर. बाकी काहीच करायचे नाही.’’ त्यामुळे मला ताण आला आहे. ‘काय करावे ?’ हे मला समजत नाही.’’ त्यावर मी त्यांना ‘गुरु म्हणजे काय ? गुरुतत्त्व आणि गुरुप्राप्ती म्हणजे काय ?’, हे सांगितले आणि ‘काळाला अनुसरून योग्य साधना कोणती ?’ याविषयी २० मिनिटे सांगून त्यांचे शंका निरसन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी त्यांना सांगितले, ‘‘आम्ही केवळ शास्त्र सांगतो. शेवटी काय करायचे, हे तुम्ही ठरवू शकता.’’ असे सांगितल्यावर त्यांचे शंकानिरसन होऊन त्यांनी योग्य ती साधना करण्याचे ठरवले.

४ ई. धर्माभिमानी

४ ई १. अग्निहोत्राविषयी लोकांना येणार्‍या अडचणी आणि त्यासंदर्भात एका संघटनेने केलेले साहाय्य : अग्निहोत्राविषयी ऑनलाईन धर्मसत्संग झाल्यावर मला बर्‍याच जिज्ञासूंचे दूरध्वनी आले. त्यांनी त्यांना कृतीच्या स्तरावर येणार्‍या अडचणी विचारल्या. त्याच वेळी अग्निहोत्राचा प्रसार करून समाजाला साहाय्य करणार्‍या एका संघटनेच्या पदाधिकार्‍यांचा मला दूरध्वनी आला. त्यांनी मला ‘तुम्ही तुमच्या सत्संगामध्ये समाजाच्या दृष्टीने आणखी कोणती माहिती देऊ शकता ?’, याविषयी काही सूत्रे सुचवली. त्यांनी अग्निहोत्रासंबंधी असलेल्या माझ्या शंकांचे निरसन केले आणि त्यांच्या संस्थेच्या वतीने कृतीच्या स्तरावर समाजाला साहाय्य करण्याची सिद्धताही दर्शवली.

४ ई २. एका धर्माभिमान्यांची सूचना : जमशेदपूर येथे एका हिंदु फळवाल्याने हिंदूंच्या देवतेचे चित्र लावले; म्हणून तेथील मुसलमानांनी त्या दुकानावर बहिष्कार घातला होता. सनातन संस्थेचे ‘ऑनलाईन’ सत्संग पहाणार्‍या जमशेदपूर येथील एका धर्माभिमान्यांनी मला सुचवले, ‘मुसलमानांच्या दुकानात मक्का-मदिनाची छायाचित्रे असतात. आपण हिंदूनी आपली दुकाने, गाड्या आणि कार्यालये यांमध्ये ‘त्रिशूळ’, ‘ॐ’, ‘स्वस्तिक’ ही मानचिन्हे लावावीत. त्यामुळे ‘ते हिंदूंचे दुकान आहे’, हे लक्षात येईल. ‘हिंदूंनी केवळ हिंदूंच्या दुकानातील माल विकत घ्यावा’, यासाठी आपण काहीतरी करूया,’ असा विचार आला.

४ उ. हेकेखोर सांप्रदायिक : एकाने मला दूरध्वनी करून सांगितले, ‘‘तुम्ही कुलदेवतेचे नामस्मरण करा’, असे का सांगत आहात ? तुम्ही हे काय लावले आहे ? याने काय होणार आहे ? संतांनी सांगितल्यानुसार सांप्रदायिक नामजप केला पाहिजे इत्यादी.’’ मी त्यांना शांतपणे सांगितले ‘‘आम्ही शास्त्र सांगतो. धर्म आणि अध्यात्मशास्त्र यांनुसार योग्य साधना कोणती, हे आम्ही सांगतो. आपण आजारी पडल्यावर वैद्य सांगतो, ते औषध घेतो. त्या वेळी ‘सर्वांना एकच औषध द्या’, असे आपण त्यांना सांगत नाही, तसेच हे आहे. शेवटी कोणती कृती करायची, हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.’’

४ ऊ. काही तथाकथित हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते

१. काही तथाकथित हिंदुत्वनिष्ठांचे दूरध्वनी आले. ते ‘स्वतःचे पद सांगून आपण किती मोठे कार्य करत आहोत’, हे सांगत होते. ‘हिंदुत्वासाठी अध्यात्मशास्त्र, धर्माचरण आणि धर्मशिक्षण यांची काहीच आवश्यकता नाही. त्यापेक्षा कट्टर होऊन संघटितपणे लढले पाहिजे’, असे त्यांचे मत होते.

२. एकाने सांगितले, ‘‘गरीब हिंदु मुलांना सर्व सोयी देऊन तुम्ही संघटित करा. त्यांना धर्मकार्यासाठी सिद्ध करा.’’

३. एकाने सुचवले, ‘हिंदूनी पाश्‍चात्त्यांसारख्या आधुनिक शाळा काढून इंग्रजी शिकण्याविषयीचे आकर्षण निर्माण करावे. त्यामुळे हिंदूंची मुले इंग्रजी माध्यमातून शिकून मोठी होतील.’

४. काही जणांचे तर ‘विरोधासाठी म्हणून विरोध करायचा’, अशा प्रकारचेही दूरध्वनी येत. त्यांचे बोलणे दुराग्रहीपणाचे असायचे. अशा वेळी त्यांना शांतपणे कसे हाताळायचे, हेही मला गुरुकृपेने शिकता आले.

५. साधकांना त्यांच्या क्षमतेनुसार सेवा उपलब्ध करून देऊन त्यांची साधना करवून घेणे, ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधकांवर होणारी गुरुकृपाच असणे

वर्ष १९९२ पासून १० वर्षे मी परात्पर गुरु डॉक्टर यांचे निवासस्थान असलेल्या मुंबई येथील सेवाकेंद्रात सेवेसाठी जात असे. तेव्हा मला प्रतिदिन ४ ते ५ घंटे एवढाच वेळ सेवेसाठी देता येत असे. तेव्हाही मला १० घंट्यांची सेवा उपलब्ध असायची. तेथील इतर २५ – ३० साधकांसाठी पुष्कळ सेवा उपलब्ध असायची. परात्पर गुरु डॉक्टर आमची एक सेवा संपण्याच्या अगोदरच दुसर्‍या अनेक सेवांचे नियोजन करत असत. ‘साधकांना त्यांच्या क्षमतेनुसार सेवा उपलब्ध करून देऊन त्यातून त्यांची साधना करवून घेणे, ही परात्पर गुरु डॉक्टर यांची साधकांवर होणारी ‘गुरुकृपा’ आहे’, असे मला वाटते.

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सेवा देऊन आपत्काळाचा ‘साधनेचा सुवर्णकाळ’ केलेला असणे

‘परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्यासारख्या वयस्कर आणि अंथरुणाला खिळून असलेल्या साधकासाठी, तसेच अन्य साधकांनाही सेवा आणि साधना करण्याची संधी देऊन कोरोना विषाणू महामारीच्या आपत्काळाचा ‘साधनेचा सुवर्णकाळ’ केला आहे’, असे मला वाटते.

७. साधकांची समष्टी साधना होण्यासाठी त्यांना अविरत सेवा देऊन त्यांची आध्यात्मिक प्रगती करवून घेणारे एकमेवाद्वितीय परात्पर गुरु डॉ. आठवले !

माझ्या मागील ३० वर्षांपूर्वीच्या अनुभवानुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांची समष्टी साधना होण्यासाठी त्यांना अविरत सेवा देऊन त्यांची आध्यात्मिक प्रगती करवून घेतली आहे. असे कुठल्याच आस्थापनात, आध्यात्मिक संस्थेत किंवा संप्रदायात होत असलेले माझ्या ऐकिवात नाही.

मानवाच्या कल्याणासाठी समाजाला धर्मशिक्षण देऊन धर्माचरण आणि सेवा करवून घेणार्‍या परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.६.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक