केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी ‘व्हेन्टिलेटर’ यंत्रणेचे प्रात्यक्षिक
नागपूर – शहरातील एकाही खासगी किंवा शासकीय रुग्णालयात खाट उपलब्ध नाही. रुग्णांची या रुग्णालयातून त्या रुग्णालयात फरफट होत आहे. असे असतांना गंभीर रुग्णांना ‘व्हेन्टिलेटर’ आणि ‘ऑक्सिजन’ खाटही मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. येथील रुग्णालयांमध्ये असलेली ‘व्हेन्टिलेटर’ यंत्रणेची कमतरता लक्षात घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ‘सी.एस्.आर्.’ निधीतून विशाखापट्टणमच्या ‘एम्.टी.झेड’द्वारे निर्मित ‘व्हेन्टिलेटर’ यंत्र नागपूरकरांसाठी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली आहे. हे यंत्र केवळ २ लाख रुपयांत उपलब्ध होणार आहे. या यंत्रणेचे प्रात्यक्षिक नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी करण्यात आले.
या वेळी नितीन गडकरी यांच्यासमवेत शहरातील तज्ञ आधुनिक वैद्यांनी या ‘व्हेन्टिलेटर’ची पहाणी केली. नितीन गडकरी म्हणाले की, शहरात कोरोनाची परिस्थिती अतिशय भीषण आहे. कोरोनाचे संकट किती दिवस चालणार ?, हे सांगता येणार नाही. त्यामुळे स्वतःची आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. राज्यात सध्या ‘व्हेन्टिलेटर’चा अभाव बघता विशाखापट्टणम् येथून १ सहस्र ‘व्हेन्टिलेटर’ मागवण्यात येणार आहेत. तसेच ऑक्सिजनचा पुरवठाही तेथूनच होईल.