‘देऊळ बंद’ असल्याने भाविकांची अनुपस्थिती
अक्कलकोट – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि श्री स्वामी समर्थ यांचे मूळस्थान असलेल्या अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात १४ एप्रिल या दिवशी स्वामींचा प्रकटदिन अत्यंत साधेपणाने; परंतु उत्साहात पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे आदेश पाळत ‘देऊळ बंद’ ठेवल्यामुळे भाविकांची अनुपस्थिती होती.
कोरोनामुळे प्रशासनाने ३० एप्रिलपर्यंत ‘देऊळ बंद’ ठेवण्याचे आदेश दिले आहेत; मात्र स्वामींचे नित्योपचार, पूजा, आरती आदी धार्मिक उपचार चालू आहेत. स्वामींच्या प्रकटदिनाच्या दिवशी पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती झाली. दुपारी १२ वाजता मंदिरातील गाभार्यात मंदिर समितीचे पदाधिकारी आणि मोजक्या सेवेकर्यांच्या उपस्थितीमध्ये गुलाल-पुष्प वाहून भजन-गीताने पाळणा कार्यक्रम पार पडला. नंतर नैवेद्य, आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या वेळी मुख्य पुरोहित मंदार पुजारी, मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, विश्वस्त महेश गोगी आदि मान्यवर उपस्थित होते.