महावितरण कार्यकारी अभियंत्याकडून मर्जीतील अभियंत्यांना कंत्राट !

माहिती अधिकारातून घेतलेल्या माहितीच्या आधारे सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचा आरोप !

यवतमाळ, १६ एप्रिल (वार्ता.) – येथील महावितरणची कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेला देण्याचा ठरलेला नियम आहे; मात्र २ कोटी रुपयांची कामे मर्जीतील ५ अभियंत्यांना दिल्याचा आरोप माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीच्या आधारे बेरोजगार अभियंता संघटनेने केला आहे. याविषयी पारदर्शकता  न पाळल्याने बेरोजगार अभियंता संघटनेने साखळी उपोषण आरंभले आहे. यात वरिष्ठ अधिकारी साद देत नसल्याने आंदोलन तीव्र करण्याची चेतावणी संघटनेने दिली आहे. महावितरणचे अधिकारी म्हणतात, ‘‘आम्ही अभियंता संघटनेला २ कोटी ४० लाख रुपयांची कामे दिली आहेत. नियमानुसारच सर्व कामे दिली असल्याने अभियंता संघटनेच्या आरोपात तथ्य नाही. यात अभियंता संघटना म्हणते, माहिती अधिकारातून मिळालेली माहिती खरी की, अधिकारी म्हणतात, ते खरे, हे त्यांनी स्पष्ट करावे.’’