परात्पर गुरु डॉक्टरांप्रती अपार भाव असलेली आणि त्यांना आश्रम बांधण्यासाठी पैसे देता यावेत, यासाठी ते साठवणारी ६३ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली डोंबिवली येथील कु. सान्वी लोटलीकर (वय ६ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. सान्वी अमेय लोटलीकर ही एक आहे !
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. सुस्पष्टपणे बोलणे
‘सान्वी बोलतांना किंवा उत्तरे देतांना स्पष्टपणे उत्तर देते. एकदा तिची आई सौ. आर्या तिला म्हणाली, ‘‘छत्रीची काय वाट लावली आहे.’’ तेव्हा सान्वीने उत्तर दिले, ‘‘छत्री वार्याने तशी झाली आहे. कुणीही तशी केली नाही.’’
२. प्रेमळ
सान्वीला तिच्या पणजीला औषधे द्यायला फार आवडते. औषधे देतांना ती व्यवस्थित मोजून देते आणि समवेत पाणी देऊन म्हणते, ‘‘आता घे.’’ पणजीने ‘गोळी घेतली का ?’, हे पाहून नंतर ती अन्यत्र जाते.
३. श्रद्धा
३ अ. मारुतीवर श्रद्धा : सान्वीला हनुमानबाप्पा फार आवडतो. अगदी लहान असतांना ती रडायला लागली की, मारुतिस्तोत्र म्हटल्यावर शांत व्हायची. आता ती अधूनमधून मारुतिस्तोत्रातील ओळी गुणगुणत असते.
३ आ. परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्यावर श्रद्धा
१. एकदा सान्वी मला म्हणाली, ‘‘आजोबा, आबा (म्हणजे कृष्णमामा, म्हणजेच परात्पर गुरु डॉ. आठवले) काळोखातही आपल्यासमवेत असतात.’’
२. एकदा मी तिला विचारले, ‘‘तू एवढी हुशार कशी झालीस ?’’ त्या वेळी तिने विलंब न करता उत्तर दिले, ‘‘आबांमुळे ! आबा मला शिकवतात.’’
३. एकदा सान्वी मला सांगत होती, ‘‘तुम्ही आजी आणि आत्या यांना सांगा की, डोळे मिटून थोडा वेळ नामजप करा, म्हणजे तुम्हाला कृष्णमामा (म्हणजे आबा) दिसेल. तो आपल्यासमवेतच असतो. केवळ त्याला डोळे बंद करून नामजप करत पहावे लागते.’’
४. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव
अ. सान्वीला परात्पर गुरुदेवांनी खाऊ (प्रसाद) पाठवला की, ती नाचायला लागते.
आ. परात्पर गुरुदेव कधी एखादी वस्तू सान्वी आणि पूर्ती (सान्वीची मोठी बहीण) दोघींना मिळून देतात. त्या वेळी सान्वीला सांगितले, ‘‘हे खेळणे आबांनी ताईला (तिची मोठी बहीण कु. पूर्तीला) दिले आहे.’’ तर ती म्हणते, ‘‘हो, मलाही दिले आहे.’’ तिला आबांनी दिलेली वस्तू ती विसरत नाही. ती वस्तू दिसली की, ती म्हणते, ‘‘मला ही आबांनी दिली आहे.’’
५. परात्पर गुरुदेवांना आश्रम बांधायला साहाय्य करण्यासाठी पैसे साठवणारी चिमुरडी सान्वी !
सान्वीने एक ‘बचत डबा’ केला आहे. एकदा तिच्यात आणि माझ्यात झालेले संभाषण
मी : तुला पैसे कशाला लागणार आहेत ?
सान्वी : आबांना मोठा आश्रम बांधायचा आहे; म्हणून मी पैसे जमा करत आहे.
मी : आबांना पैसे लागत नाहीत.
सान्वी : त्यांना नाही, आश्रम बांधण्यासाठी लागणार आहेत. आजोबा, किती पैसे लागतील ?
मी : पुष्कळ लागतील.
सान्वी : मी प्रतिदिन बाबांजवळ मागते. तुम्हीही द्या.
त्या दिवसापासून ती न विसरता आमच्याकडे पैसे मागते.’
– श्री. विजय लोटलीकर (कु. सान्वी हिचे आजोबा), डोंबिवली, ठाणे. (२३.७.२०१८)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |