खाट उपलब्ध न झाल्याने कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू

रांची (झारखंड) येथे राज्याचे आरोग्यमंत्री रुग्णालयात उपस्थित असतांना संतापजनक घटना !

  • राज्यातील जनतेच्या आरोग्याचे दायित्व स्वीकारलेले काँग्रेसचे आरोग्यमंत्री अशा प्रकारची निष्क्रीयता आणि असंवेदनशीलता दाखवणार असतील, तर गुजरात उच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे कोरोनाच्या काळात जनतेचे आरोग्य ‘भगवान भरोसे’च असणार, यात शंकाच नाही ! त्यामुळे जनतेने आतातरी रक्षणासाठी देवाची आराधना करावी !
  • संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवला असल्यामुळे सर्वच ठिकाणची आरोग्ययंत्रणा अपुरी पडू लागली आहे आणि त्यामुळेच अशा घटना घडत आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी आतापर्यंत आरोग्यव्यवस्थेकडे दुर्लक्ष केल्याने अशा आपत्काळात जनतेचे हाल होत आहेत, हे स्पष्ट आहे !

रांची (झारखंड) – येथे रुग्णालयात भरती होण्यासाठी आलेल्या कोरोना रुग्णाला अर्धा घंटा खाट उपलब्ध न झाल्याने त्याचा उपचारांविना मृत्यू झाला. हा रुग्ण राज्यातील हजारीबाग येथून उपचारांसाठी आला होता; मात्र रुग्णालयाच्या पायर्‍यांवरच त्याचा मृत्यू झाला.

कोरोनाबाधीत असलेल्या या रुग्णाला डॉक्टरांनी तपासले नाही. पीडित रुग्णाची मुलगी आणि नातेवाईक रुग्णालयातील डॉक्टरांना विनवण्या करत होते; मात्र कुणीही त्यांना दाद दिली नाही. राज्याचे आरोग्यमंत्री आणि काँग्रेसचे बन्ना गुप्ता हेही तेथे उपस्थित होते; मात्र तेसुद्धा त्यांच्यासमोरून निघून गेले. ‘येथील परिस्थिती सामान्य आहे’ असेही ते म्हणाले. प्रत्यक्षातही स्थिती या घटनेतून उघड झाली. ‘राजकारण्यांना केवळ मतांशी देणेघेणे आहे. ते मला माझे वडील परत मिळवून देऊ शकतात का?’, असा प्रश्‍न मृत रुग्णाच्या मुलीने विचारला आहे. हा प्रकार समजल्यावर मंत्री गुप्ता यांनी सारवासारव करत आरोग्य विभागाला दोष देत ‘असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत’, अशी पोकळ चेतावणी दिली.