वर्षभरात पोलिसांकडून ९०० धाडी
पणजी, १३ एप्रिल (वार्ता.) – कोरोना महामारीमुळे देशभर लागू केलेल्या दळणवळण बंदीचा गोव्यातील हॉटेल आणि इतर व्यावसायिक यांच्या आर्थिक व्यवहारांना पुष्कळ मोठ्या प्रमाणात फटका बसला; परंतु या गोष्टीचा गोव्यात अवैधपणे चालणार्या अमली पदार्थ व्यवसायावर फारसा परिणाम झाला नाही. पोलिसांकडे असलेल्या अधिकृत नोंदींनुसार अमली पदार्थ व्यवसाय करणार्यांवर या महामारीच्या वर्षांत पोलीस, गोवा पोलिसांचा गुन्हे अन्वेषण विभाग आणि अमली पदार्थविरोधी पथके यांनी मिळून जवळजवळ ९०० धाडी घातल्या. याचाच अर्थ जवळपास दिवसाला २ धाडी, असे हे प्रमाण होते. यांपैकी बहुतांश धाडी या कळंगुट, हणजूण, पेडणे या पोलीस ठाण्यांच्या कक्षेत येणार्या बागा, मोरजी आणि हरमल या भागांत घालण्यात आल्या. वर्ष २०१६, २०१७ आणि २०२० या वर्षांमध्ये धाडी घालण्याची सरासरी दिवसाला दोनहून अधिक होती. वर्ष २०१८ आणि २०१९ या वर्षांत ही सरासरी वाढून दिवसाला तीनहून अधिक अशी झाली. वर्ष २०१६ मध्ये एकूण ८९८ धाडी घालण्यात आल्या, तर त्या पुढच्या वर्षात ही संख्या ८१८ होती; परंतु वर्ष २०१८ मध्ये १ सहस्र ६ धाडी आणि वर्ष २०१९ मध्ये १सहस्र १७९ धाडी घालण्यात आल्या. २०२० या महामारीच्या वर्षात एकूण ८९१ धाडी घालण्यात आल्या. अलीकडेच विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सत्रामध्ये ‘गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने गोव्यात अमली पदार्थांचा व्यवसाय चालू असल्याचे मान्य करण्यात आले होते.’
विधानसभेत गोव्यातील अमली पदार्थ व्यवहारासंबंधी प्रश्न उपस्थित केल्यानंतर ‘गोवा राज्यात अमली पदार्थांचा वापर करणे आणि दुसर्या ठिकाणी पाठवणे, यासाठी अमली पदार्थांची तस्करी होते’, असे लेखी उत्तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे. १० वर्षांपूर्वी रवि नाईक गोव्याचे गृहमंत्री असतांना राजकारणी आणि अमली पदार्थांचा व्यवसाय करणार्यांमध्ये संबंध असल्याचे प्रकरण गाजले होते. या प्रकरणी अन्वेषण करण्यात आले होते; परंतु पुढे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.