सांगली – गृहविलगीकरण नियमांचे उल्लंघन करणार्यांवर सांगली ग्रामीण, पलूस, भिलवडी, कडेगाव अशा विविध ठिकाणी कारवाई करून ५ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली. सांगली जिल्ह्यात सध्या २ सहस्र ७३४ नागरिक, ३ पोलीस अधिकारी, ८ पोलीस अमलदार यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
तरी गृहविलगीकरणात असलेल्या व्यक्तींनी शासकीय नियमांचे पालन करावे. मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, विनाकारण घराबाहेर पडू नये, प्रशासनास सहकार्य करावे, नियमांचे पालन करावे, असे आवाहन करून जे नागरिक नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही पोलीस अधीक्षकांनी कळवले आहे.
‘रेमडेसिविर’चा सुरळीत पुरवठा आणि वाटप यांवर नियंत्रणासाठी अन्न अन् औषध प्रशासनाच्या अधिकार्यांची नियुक्ती ! – जिल्हाधिकारी
सांगली – वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘रेमडेसिविर’ इंजेक्शन औषधांच्या दुकानावरून थेट विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनचा पुरवठा वितरकांद्वारे केवळ कोरोना रुग्णालय आणि संलग्न औषधी दुकाने येथेच करण्यात यावा, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिला आहे. ‘रेमडेसिविर’चा सुरळीत पुरवठा आणि वाटप यांवर नियंत्रण आणण्यासाठी अन्न अन् औषध प्रशासन यांच्या अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.