बंगालमधील अराजक !

बिहार येथील एक पोलीस अधिकारी अश्‍विनी कुमार हे बंगालमधील दिनाजपूर येथील एका गावात एका मोटारसायकल चोरीच्या संदर्भात धाड घालण्यास गेले होते. हे गाव बिहार आणि बंगाल यांच्या सीमेला लागून आहे; मात्र या पोलीस अधिकार्‍याच्या संदर्भात अत्यंत दुर्दैवी घटना घडली. ज्या गावातील चोराच्या घरी ते धाड टाकण्यास गेले होते, त्यांच्यावर तेथील स्थानिकांनी आक्रमण करत त्यांच्यावर दगडफेक केली आणि त्यांना मरेपर्यंत मारहाण केली. त्यांना रुग्णालयात नेल्यावर मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी फिरोज आलम, अबूझर आलम आणि साहीनूर खातून या ३ जणांना अटक केली आहे. यातून जमाव अथवा स्थानिक कोण होते, याची कल्पना येईल. शेजारील राज्यातील एक पोलीस अधिकारी कारवाई करण्यास आला आहे, हे कळल्यावर तेथे जमाव जमतो, आक्रमण करतो आणि त्यांची हत्या करतो, हेच मुळात चीड आणणारे आहे.

जमावाचे राजकारण

मुळात जमाव जमलाच कसा हा प्रश्‍न आहे ? अटक केलेल्या नावांतून जमाव धर्मांधांचा होता, याची निश्‍चिती पटते. धर्मांधांना पोलीस आणि प्रशासन यांचे वावडेच मुळी ! त्यांच्या लेखी पोलीस अधिकारी आणि तोही हिंदु म्हणजे काफीरच ! त्यामुळे एखाद्या व्यवस्थेवरच आक्रमण करत आहे, याचे भान त्यांना कोण आणून देणार? विशेष म्हणजे अश्‍विनी कुमार यांनी संबंधित गावात कारवाईला जाण्यापूर्वी बंगालच्या स्थानिक पोलिसांचे साहाय्य मागितले होते; मात्र त्यांना ते मिळाले नाही. ही दुसरी चीड आणणारी घटना ! बंगालमधील पोलिसांचे साहाय्य मिळाले नाही, यापेक्षा पोलिसांनी जाणूनबुजून साहाय्य केले नाही, असे म्हणणे सयुक्तिक वाटते. दुसर्‍या राज्यातून जेव्हा एखादा पोलीस अन्य राज्यात कारवाईसाठी जातो, तेव्हा स्थानिक पोलिसांनी असणे आवश्यकच असते. जे पोलीस समवेत गेले नाहीत, त्यांच्यावरही कारवाई तीही कठोर होणे आवश्यक आहे. बंगालमधील प्रत्येक घटनेला ममता(बानो) उत्तरदायी असतात, असे म्हटले जाते. या प्रकरणी पोलिसांचे साहाय्य न मिळण्यास त्याही उत्तरदायी असू शकतात. त्यांनी पोलिसांना असे काही आदेश दिले आहेत का ? याची चौकशी होणे आवश्यक आहे. बिहार म्हणजे नितीश कुमार अर्थात् भाजपचे सरकार तेथून एखादा सरकारी अधिकारी येतो म्हणजे भाजपचाच माणूस येतो, ही सर्वसामान्य तृणमूलवासियांची भावना करून दिलेली असू शकते. बिहारच काय भाजपशासित प्रत्येक राज्यातील सरकारी कर्मचारी हा ममतादीदींच्या लेखी भाजपचाच माणूस असणार, यात शंकाच नाही.

बंगालमधील हिंसाचार

बंगालमधून बाहेरून पोलीस आले आणि त्यांची हत्या झाली, ही भयावह घटना आहेच. २-३ वर्षांपूर्वी खुद्द बंगाली पोलीसच त्यांच्यावर धर्मांधांकडून होत असलेल्या आक्रमणामुळे भयभीत होऊन रडून स्वत:ची व्यथा सांगत असलेले व्हिडिओ सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित झाले होते. या पोलिसांची ही अवस्था, तर सर्वसामान्यांची स्थिती काय असेल, याची कल्पना करता येत नाही. काही दिवसांपूर्वी प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये एका चहाच्या टपरीवर भाजपचा झेंडा लावलेला पाहून टपरी जवळून जाणार्‍या जमावाने झेंडा काढून फेकून दिला, तेथे नासधूस केली आणि टपरी चालकाला मारहाण केली, अशी दृश्ये होती. ‘झी न्यूज’ची गाडी ज्यामध्ये महिला पत्रकार आणि छायाचित्रकार होते, ती गाडी एका गावातून जात असतांना जमावाने अक्षरश: पहारी आणि दगड मारून गाडीच्या काचा फोडल्या, गाडीला घेराव घातला आणि आतील सर्वांना धमकावले. हा प्रक्षुब्ध जमाव सर्वांना ठार करणार कि काय ? असेच गाडीतील पत्रकार आणि छायाचित्रकार यांना वाटत होते.

बंगालची नवी ओळख

बंगालमध्ये ममतादीदी यांनी स्वत:च्या सत्ताकाळात काय पेरून ठेवले आहे, हे लक्षात येते. बंगालच्या व्यतिरिक्त अथवा बाहेरून जे येतात, ते सर्व विदेशी अथवा पाकिस्तानी आहेत कि काय ? अशा प्रकारे बंगालमधील काही ठिकाणचा जमाव प्रक्षुब्ध होत आहे. हिंसक होणे आणि हिंसा करणे, ही आता ग्रामीण बंगालची नवीन ओळख होते आहे, असे म्हटल्यास चुकीचे ते काय ? बंगाल तसे क्रांतीकारकांचे राज्य ! भारतीय स्वातंत्र्यलढ्यात प्रचंड योगदान देणारे एकाहून एक क्रांतीकारक येथे निर्माण झाले. आज त्याच बंगालची अवस्था दंगेखोरांचा प्रदेश होण्यासाठी ममतादीदीच उत्तरदायी आहेत.

बंगालमधील एका आय.पी.एस्. दर्जाच्या पोलीस अधिकार्‍याने त्याची व्यथा हृदयद्रावक शब्दांत मांडून आणि त्याच्या कटू अनुभवाची कहाणी लिहित जीवनयात्रा संपवली. त्यांनी त्यांचे कर्तव्य अतिशय चोखपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांची बढती रोखण्यात आली. त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी अनेक समस्या निर्माण करण्यात आल्या. त्यांनी व्यवस्थेतील त्रुटींविरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांचे स्थानांतर अनेक वेळा झाले, न्यायालयात खेपा मारल्या, शेवटी या राज्यात न्याय मिळणार नाही, असा निष्कर्ष काढून त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येला ममतादीदीच उत्तरदायी होत्या.

सध्या बंगालची ओळख आक्रमण करा, तोडफोड करा, हाणामारी करा, बॉम्ब बनवून फोडा, हिंदू असो वा पोलीस असो त्यांना मारहाण करा, भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या, देवतांचे विडंबन करा, घुसखोरांना आश्रयस्थान, गोतस्करी, अशी विकसित होत आहे. यापूर्वी बंगालमध्ये जागोजागी अनेकांकडे बॉम्ब सापडायचे. काही बॉम्ब फुटायचे, तेव्हा समजायचे की, येथे कुठेतरी बॉम्ब आहेत. देशातील एका राज्यात अशी स्थिती असेल, तर तेथे नागरिक कायदा-सुव्यवस्था कधी तरी अनुभवू शकतील का ? एका पोलीस अधिकार्‍याला ठार केले जाणे, यापेक्षा आणखी वाईट परिस्थिती काय असणार ? केंद्र सरकार आता कुठली परिस्थिती चिघळण्याची वाट पहात आहे ? मध्यंतरी भाजपच्या लोकप्रतिनिधींनीच ‘बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी’, असे सांगितले होते. त्यांची मागणी आणि जनभावना लक्षात घेता, बंगालमध्ये अधिक अराजक निर्माण होऊ नये, म्हणून राष्ट्रपती राजवट लवकरात लवकर लागू करावी, हीच अपेक्षा !