जीवघेणी संस्कृती !

अमेरिका आणि हिंसाचार हे समीकरण संपूर्ण विश्‍वासाठी काही नवीन नाही. तेथील प्रत्येक हिंसाचारात गोळीबार हा घटक तितकाच महत्त्वाचा ठरतो. मागील काही वर्षांमध्ये अमेरिकेत घडलेल्या घडामोडींचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की, तेथे मोठ्या प्रमाणात ‘बंदूक संस्कृती’ (गन कल्चर) फोफावत आहे. तिला ना कसले ताळतंत्र आहे, ना कुठला सारासार विचार ! अमेरिकेत प्रतिदिन पुष्कळ लोक बंदुकांचा वापर करून केलेल्या हिंसेत मरण पावतात, असा संशोधनातील निष्कर्ष आहे. सध्या अमेरिकेत सर्वाधिक प्रमाणात बंदुकांची विक्री होत आहे. त्यामुळे त्या विक्रीला जीवघेणे ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले आहे. वाढता गोळीबार लोकांना बंदुका घेण्यास प्रवृत्त करत आहे. हे वास्तव भविष्याच्या दृष्टीने अधिकच गंभीर आणि चिंताजनक आहे. ‘बंदुकांची खरेदी करण्यात अमेरिकी लोकांपेक्षा चिनी वंशीय अमेरिकी लोक पुढे आहेत’, असे म्हटले जाते. अमेरिकी नागरिकांचा एक वर्ग बंदूक घेण्यासाठी साहाय्य निधी (गनमनी) पुरवतो. जितका निधी अधिक, तितकी बंदुकांची विक्री अधिक होते. ‘नॅशनल आफ्रिकन अमेरिकन गन असोसिएशन’चे संस्थापक फिलिप स्मिथ म्हणाले, ‘‘बंदूक घ्यावी लागेल, अशी ज्यांनी कल्पनाही केली नसेल, तेही लोक आता बंदूक खरेदी करत आहेत. स्वत:ला आणि कुटुंबाला कसे वाचवता येईल, याचा लोक विचार करतात.’’ ‘बंदूक’ म्हणजे स्वरक्षणाचे एकमेव साधन आहे’, असा विचार आज तेथील प्रत्येक जण करतो. एका मर्यादित टप्प्यापर्यंत बंदूक बाळगणे किंवा तिचा अपरिहार्य कारणांसाठी वापर करणे हे ठीक आहे; पण सरसकट बंदूक वापरण्याचे स्वातंत्र्य असणे अयोग्य आहे. अमेरिकेत बंदुकांची खरेदी स्वरक्षणाच्या हेतूने होत असली, तरी त्यांचा वापर मात्र गोळीबारासाठी केला जातो, हे भयावह आहे. १० जणांपैकी ३ तरुणांकडे बंदूक असतेच. या बंदूक खरेदीमध्ये प्रथमच बंदुकीची खरेदी करणारे, एकल पालक (सिंगल पॅरेंट), पालक (आई-वडील) यांचाही सहभाग वाढत आहे. यावरूनच तेथील जनतेची मानसिकता दिसून येते. एकदा एका हास्यचित्रात अमेरिकेतील मुलगा आणि वडील यांचा संवाद दिला होता. मुलगा वडिलांना म्हणतो, ‘‘ही तुमची बंदूक परत घ्या. शाळेत जरा अडचण होती; पण मी आता हिच्या साहाय्याने सोडवली आहे.’’ हा विनोद नव्हे, तर आज अमेरिकेत असलेली ही भयानक वस्तूस्थिती आहे.

बंदुकीचे समर्थन !

बंदुकांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढल्याने अमेरिकेच्या बाजारात बंदुकांचा तुटवडा निर्माण झाला आहे. बंदूक संस्कृतीची वाढती व्याप्ती पहाता ‘अमेरिकेच्या शस्त्रास्त्र उद्योगाचे आज सैन्यकरण झाले आहे’, असेच म्हणता येईल. जगभरात निर्मिती होणार्‍या सर्व बंदुकांतील अर्धा साठा एकट्या अमेरिकेत खरेदी केला जातो. व्यक्तीगत स्वातंत्र्याला दिल्या जाणार्‍या अतिरेकी महत्त्वाचाच हा परिणाम म्हणावा लागेल. अमेरिकेमध्ये असलेल्या व्यक्तीस्वातंत्र्याला कुणीही रोखू शकत नाही, ना कुणी ते हिरावून घेऊ शकते ! त्यामुळे याचाच संबंध बंदूक संस्कृतीशी जोडला जाऊन तिचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. अमेरिकेची भांडवलशाहीवर आधारित असणारी राजकीय व्यवस्था आणि प्रत्येकाकडून केला जाणारा अतार्किक विचार या गोष्टीही बंदूक संस्कृतीच्या विस्ताराला तितक्याच कारणीभूत आहेत. हे सर्वच धक्कादायक आणि जीवघेणे आहे. वाढत्या बंदूक संस्कृतीला आळा घालण्यासाठी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ८ एप्रिलला ६ आदेश काढले आहेत. बायडेन यांना यावर आळा घालायचा असेल, तर केवळ आदेश काढून चालणार नाही, तर त्यांची कार्यवाही कठोरपणे होणेही तितकेच आवश्यक आहे. बायडेन यांनी या संस्कृतीमुळे होणार्‍या भीषण हानीकडे अधिकाधिक संवेदनशीलतेने पहायला हवे. या संस्कृतीचे समर्थन करणार्‍या यंत्रणाही अमेरिकेत अस्तित्वात आहेत. अमेरिकेतील एका चर्चने बंदूक संस्कृतीला चालना देण्यासाठी प्रार्थनेचे आयोजन केले होते. त्यात सहभागी होणार्‍यांना बंदुका घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले होते. ज्यांच्याकडे बंदुका नव्हत्या, त्यांना भविष्यात बंदूक खरेदी करणार असल्याचे शपथपत्र पैसे देऊन आणण्यास सांगितले होते. अशा प्रकारे बंदूक संस्कृतीच्या समर्थनाची मानसिकता बाळगणार्‍यांचा प्रथम बंदोबस्त करणे, हेही राष्ट्राध्यक्षांच्या समोरील मोठे आव्हानच आहे.

‘विकसित आणि आर्थिकदृष्ट्या पुढारलेला’, असे ओळखल्या जाणार्‍या अमेरिकेतील जनता बंदूक संस्कृतीमुळे किती प्रमाणात असुरक्षित, चिंताग्रस्त अन् एकलकोंडी झाली आहे, हेच या सर्व विवेचनावरून दिसून येते. बंदूक संस्कृतीनेच आज तेथील विद्यार्थ्यांचे बालमन हिरावून घेतले आहे, पती-पत्नीच्या नातेसंबंधात घटस्फोट डोकावत आहे. याच्या जोडीला सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक अशा विविध स्तरांवर होणारे परिणाम वेगळेच ! ही सर्व स्थिती पहाता भविष्यातील अमेरिकेची सर्वच स्तरांवरील वाटचाल कशी असेल, याचा विचारच न केलेला बरा ! अमेरिकेने या बंदूक संस्कृतीवर नव्हे विकृतीवर आळा घातला नाही, तर त्याचे दूरगामी परिणाम तेथील समाजाला भोगावे लागतील.

अपयशी अमेरिका !

वर्ष २०१७ मध्ये अमेरिकेत ३० कोटी बंदुका होत्या. आता तर गेल्या ३-४ वर्षांतील तेथील खरेदी प्रक्रिया पहाता हा आकडा ५० कोटींहून अधिक असू शकतो. या आकडेवारीवरून तेथील संस्कृतीच्या तीव्रतेची कल्पना येते. अमेरिकेचा जेव्हा जन्म झाला, तेव्हापासूनच ही बंदूक संस्कृती तेथे अस्तित्वात आहे. अमेरिका संघराज्य झाले, तेव्हा तेथे सैन्य किंवा पोलीस नव्हतेे. त्यामुळे तेव्हाही या संस्कृतीने तेथे वर्चस्व गाजवले. अर्थात् ही काही मर्दुमकी नव्हे. ज्या लोकांना बंदुकांची आवश्यकता नाही, त्यांच्या हाती बंदुका जाऊ नयेत, यासाठी तेथील राज्यकर्ते काही प्रयत्न करतात का ? हेही पहायला हवे. बंदूक संस्कृती सर्वविनाशी आहे. तिच्या आधारावर देशाची, पर्यायाने नागरिकांची सुरक्षा अवलंबून असणे हे देशाचे सर्वंकष अपयशच म्हणावे लागेल. ज्या राष्ट्रातील जनता खर्‍या अर्थाने सुरक्षित असते, त्या राष्ट्राचा उत्कर्ष सहजगत्या होतो, हे लक्षात घेऊन बंदुकीच्या गोळीने विध्वंस पदरी पाडून घ्यायचा कि सुरक्षितता प्रदान करायची, याचा बलाढ्य अमेरिका विचार करील तो सुदिन !