फाल्गुन मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्व

साप्ताहिक शास्त्रार्थ

‘१४.३.२०२१ या दिवसापासून फाल्गुन मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत. ४.४.२०२१ ते १०.४.२०२१ या सप्ताहातील दिनविशेष देत आहोत.

१. हिंदु धर्मानुसार ‘शार्वरी’ नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४२, उत्तरायण, शिशिरऋतू, फाल्गुन मास आणि कृष्ण पक्ष चालू आहे.

(संदर्भ : दाते पंचांग)

सौ. प्राजक्ता जोशी

२. शास्त्रार्थ

२ अ. अमृत योग : सोमवारी श्रवण नक्षत्र असल्यास ‘अमृत योग’ होतो. अमृत योगावर कोणतेही शुभ कार्य केल्यावर यश प्राप्त होते. ५.४.२०२१ या दिवशी हा योग उत्तररात्री २.०५ पासून दुसर्‍या दिवशी सूर्योदयापर्यंत आहे.

२ आ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. ५.४.२०२१ या दिवशी उत्तररात्री २.१९ पासून ६.४.२०२१ च्या उत्तररात्री २.१० पर्यंत घबाड मुहूर्त आहे.

२ इ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळाला ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्याला विलंब होण्याचा संभव असतो. ६.४.२०२१ या दिवशी दुपारी २.११ पासून उत्तररात्री २.१० पर्यंत आणि ९.४.२०२१ या दिवशी उत्तररात्री ४.२८ पासून १०.४.२०२१ या दिवशी सायंकाळी ५.१३ पर्यंत विष्टी करण आहे.

२ ई. पापमोचनी एकादशी : फाल्गुन कृष्ण पक्ष एकादशीला ‘पापमोचनी एकादशी’ असे म्हणतात. या दिवशी श्री लक्ष्मी आणि भगवान विष्णु यांची पूजा करतात. या दिवशी एकादशी महात्म्य, श्री विष्णुसहस्र नामावली वाचावी. पापमोचनी एकादशीच्या व्रताने सर्व पापांचा नाश होतो. या दिवशी ‘आपल्या हातून घडलेल्या सर्व चुका मान्य करून त्यासाठी प्रायश्‍चित घेतल्यास मनःशांती मिळते’, असे मानले जाते. या दिवसापासून ‘पुढील जीवनात हातून चुका घडू नयेत’, यासाठी संकल्प करून स्वभावदोष निर्मूलनाची प्रक्रिया चालू केल्यास आध्यात्मिक प्रगती होते. बुधवार, ७.४.२०२१ या दिवशी पापमोचनी एकादशी आहे. बुधवारी येणार्‍या एकादशीला विशेष महत्व असते.

२ उ. तिथीवासर : द्वादशी तिथीच्या प्रथम पादाला ‘तिथीवासर किंवा हरिवासर’ असे म्हणतात. वैष्णवांनी या काळात भोजन करू नये. ८.४.२०२१ या दिवशी सकाळी ८.४१ पर्यंत तिथीवासर आहे.

२ ऊ. शुक्र किंवा भृगु प्रदोष : प्रत्येक मासातील शुक्ल आणि कृष्ण त्रयोदशीला ‘प्रदोष’ असे म्हणतात. शुक्रवारी येणार्‍या त्रयोदशी तिथीला ‘शुक्रप्रदोष’ किंवा ‘भृगु प्रदोष’ म्हणतात. ९.४.२०२१ या दिवशी शुक्र प्रदोष आहे. जीवनातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी, तसेच वैवाहिक सुखासाठी ‘भृगु प्रदोष’ हे व्रत करतात. प्रदोष या व्रताची देवता ‘शिव’ आहे. या दिवशी शिवकवच आणि शिवमहिम्नस्तोत्र वाचावे.

टीप १ – ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदयानंतर वार पालटतो.
टीप २ – घबाड मुहूर्त, क्षयदिन, भद्रा (विष्टी करण), दग्ध योग, संकष्ट चतुर्थी, आणि कालाष्टमी तिथी यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे.
टीप ३ – वरील सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत.१. हरिचिया दासा हरि दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ॥ – संत एकनाथ
अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो.२. तुका म्हणे हरिच्या दासा । शुभ काळ दाही दिशा ॥ – संत तुकाराम
अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘भक्तासाठी सर्व दिशा आणि वेळ ही शुभच असते.’​ज्या व्यक्तीच्या मनात सतत ईश्‍वरप्राप्तीचा ध्यास आहे, अशा भक्ताची काळजी ईश्‍वर घेतो.

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्‍लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, फोंडा, गोवा. (२७.३.२०२१)